अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकी दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियानं नमते घेतले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:30 PM, 20 Oct 2020
अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

मुंबई- ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकी दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियानं नमते घेतले आहे. (Marathi language in the Amazon app)

यूएसएचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अ‍ॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. स्वत: अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या मेलची दखल घेतली आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी 20 दिवस लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अ‍ॅपमधील इतर भाषा महाराष्ट्रात ब्लॉक करा, अशी मागणीही मनसेनं केली आहे.

जवळपास 2 कोटी प्रोडक्टची मेगा चेन तयार करण्याचं दोन्ही कंपन्यांपुढे आव्हान आहे. ‘अ‍ॅमेझॉन’च्या अ‍ॅपमध्ये मराठीच्या समावेशाबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ईमेलला कंपनीने उत्तर दिले होते. त्यानंतर एक बैठकही झाली आहे. या ईमेलचा स्क्रीनशॉट चित्रे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिली आहे,” असे ‘अ‍ॅमेझॉन’च्या वतीने कार्तिक नामक व्यक्तीने लिहिले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली. ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ आज मुंबईत येणार आहे. राजसाहेब म्हणतात तसं, तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं” असं अखिल चित्रेंनी लिहिलं आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेने 15 ऑक्टोबरला संबंधित कंपन्यांच्या मुंबईतील ऑफिसला धडक दिली होती. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.

मनसेचा खळ्ळ खट्यॅकचा इशारा

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. यावेळी खिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवला नाही, तर स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.

संबंधित बातम्या :

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

(Marathi language in the Amazon app)