गडचिरोलीत भाषेचं जतन करण्यासाठी आदिवासी समाजाकडून पहिली गोंडी भाषा शाळा सुरू

पारंपरिक पेहराव आणि आदिवासी गोटूलचे स्थान यामुळे गोंडी भाषकांचा शाळेला मोठा प्रतिसाद लाभतो आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:53 PM, 3 Mar 2021
गडचिरोलीत भाषेचं जतन करण्यासाठी आदिवासी समाजाकडून पहिली गोंडी भाषा शाळा सुरू

धानोराः गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज स्वतःची गोंडी भाषा जिवंत ठेवण्यासाठी पुढे सरसावलाय. धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेने पहिली गोंडी भाषा शाळा सुरू केली. मोहगाव येथील गोंडी भाषा शाळेत भाषा, लिपी, व्याकरण शिकविण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आलीय. ग्रामसभेने ठराव घेत गोंडी भाषा शाळेसाठी शिक्षक, पाठ्यपुस्तके, आहार देण्याची तरतूद केली असून, शहरी वातावरणात रुळताना आपली मूळ भाषा, संस्कृती टिकविण्याची धडपड केली जाते. पारंपरिक पेहराव आणि आदिवासी गोटूलचे स्थान यामुळे गोंडी भाषकांचा शाळेला मोठा प्रतिसाद लाभतो आहे. (first Gondi language school started by the tribal community to save the language in Gadchiroli)

…म्हणून मोहगाव इथं नवी शैक्षणिक क्रांती घडली

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात अतिदुर्गम अशा मोहगाव इथं नवी शैक्षणिक क्रांती घडली. या जिल्ह्यातील आदिवासींची मायबोली गोंडी भाषेला मुख्य प्रवाहात आणण्याची ही क्रांती आहे. ही क्रांती घडवण्यासाठी कुणी शिक्षणमहर्षी इथं आला नाही, तर मागास म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एका अतिदुर्गम गावच्या ग्रामसभेनं हा चमत्कार करून दाखवला.

गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा मोहगाव इथं सुरू

ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा मोहगाव इथं सुरू झाली. पहिला वर्ग इथं सुरू झाला असून, त्यात 30 विद्यार्थी गोंडी भाषेचे धडे गिरवत आहेत. गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार आणि शिक्षण देणारं केंद्र आपल्या गावात असावं, असा निर्धार गावानं केला आणि आदिवासींचे दैवत असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या साक्षीनं ही शाळा सुरू केली.

आदिवासींच्या नव्या पिढीला भाषेनं अलंकृत करणार

छत्तीसगडच्या सीमेवर आणि नक्षलप्रभावित असलेल्या या भागात शिक्षणाची ही नवी पहाट आदिवासींच्या नव्या पिढीला भाषेनं अलंकृत करणार आहे. विशेष म्हणजे गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. मात्र तरीही गोंडी शाळेत 30 चिमुकल्यांनी उपस्थिती उत्साह वाढवणारी आहे. सध्या या शाळेत दोन शिक्षक आहेत. या शिक्षकांचा पेहरावही खास पारंपरिक आहे. खडू-फळ्याऐवजी पांढरा बोर्ड आणि पेन वापरून शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्यात आली. सध्या प्राथमिक शिक्षण दिलं जात असल्यानं अंक आणि बाराखडीची माहिती दिली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना गोंडी भाषेची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली.

लोकसंख्या सर्वाधिक असूनही आपली मातृभाषा दुर्लक्षित

छत्तीसगडमधील सरोना इथं देशातील पहिली गोंडी भाषा शाळा सुरू झाली. आता याच ठिकाणाहून छापील साहित्य आणलं जात आहे. सरोना इथंच येत्या काही दिवसांत हे शिक्षक प्रशिक्षणाला जाणार आहेत. भविष्यात दहावीपर्यंत ही शाळा नेण्याचा ग्रामसभेचा निश्चय आहे. लोकसंख्या सर्वाधिक असूनही आपली मातृभाषा दुर्लक्षित आहे. ती हळूहळू नामशेष होत चालली. त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं शिक्षक सांगतात.

तरी राज्य शासनानं याला मान्यता द्यावी

ग्रामसभेनं विद्यार्थ्यांना गणवेश, जोडे आणि लेखन साहित्य दिलं असून, दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही केलीय. आता ही शाळा ग्रामसभेनं आपल्या संवैधानिक अधिकारात सुरू केली असली तरी राज्य शासनानं याला मान्यता द्यावी, यासाठी राज्यपाल आणि आदिवासी विकास विभागाला प्रस्ताव पाठवला. पुढे या शाळेचा विस्तार करून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची ग्रामसभेची योजना आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

आरोग्य विभागाच्या भरतीत परीक्षेआधीच सावळा गोंधळ, लाखो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

first Gondi language school started by the tribal community to save the language in Gadchiroli