सरपंच ते मुख्यमंत्री, उस्मानाबादमध्ये पहिले राजकीय साहित्य संमेलन

उस्मानाबादमध्ये 10 ते 12 जानेवारी दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं नव्हतं.

political Marathi literature festival, सरपंच ते मुख्यमंत्री, उस्मानाबादमध्ये पहिले राजकीय साहित्य संमेलन

उस्मानाबाद : मंत्र्यासह राजकीय नेत्यांना 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपीठावर स्थान आणि मानपान न दिल्याने उस्मानाबादेमध्ये फेब्रुवारी महिन्यात राजकारण्यांचे देशातील पहिले अखिल भारतीय राजकीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे (political Marathi literature festival). विशेष म्हणजे 93 वे मराठी साहित्य संमेलन पार पडले त्याच जागी हे राजकीय संमेलन होणार आहे. या दोन दिवसीय राजकीय संमेलनाला मुख्यमंत्र्यापासून गावच्या सरपंचांपर्यंत सर्व नेत्यांना आमंत्रित करणार असल्याची माहिती उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूराजे निंबाळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली .

राजकीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी बरोबरच इतर कार्यक्रम असतील. संमेलनात राजकारणी त्यांचे अनुभव व्यक्त करीत दुष्काळ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यासारख्या समस्यांवर चर्चा करतील. या संमेलनात राजकीय नेते त्यांचे साहित्य सादर करतील, असे राजे निंबाळकर म्हणाले (political Marathi literature festival).

उस्मानाबादमध्ये 10 ते 12 जानेवारी दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं नव्हतं. उस्मानाबादचे खासदार आणि सर्व आमदार, नगराध्यक्ष यांच्याबाबतही हाच प्रकार घडला. कार्यक्रमपत्रिकेवर साधे नावसुद्धा छापले नव्हते. त्यामुळे राजकीय नेते दुखावले गेले आणि त्यातूनच राजकीय साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली गेली.

संमेलनाच्या निधीसह विविध प्रशासकीय मदत संमेलनात केली, मात्र साहित्यिकांना राजकीय नेत्यांची इतकी अॅलर्जी का? असा सवाल उपस्थित झाल्याने संमेलनात साहित्य मंडळाची मक्तेदारी मोडीस काढण्यासाठी आणि साहित्यिकांच्या वैचारिक कक्षा रुंदाविण्यासाठी विद्रोह म्हणून राजकीय साहित्य संमेलन होणार आहे. यात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना सुद्धा मानाचे स्थान दिले जाणार आहे, असे नगराध्यक्ष राजे निंबाळकर यांनी सांगितले.

साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचा अपमान करणे उचित नाही, साहित्य क्षेत्रात त्यांना अस्पृश्य मानण्याचे कारण नाही, राजकीय क्षेत्रातही अनेक साहित्यिक मंडळी आहेत, राजकीय ताकतीशिवाय संमेलन पार पडू शकणार नाही, संमेलनात जनतेच्या अनेक प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने राजकीय संमेलन घेणार असल्याची भूमिका उस्मानाबाद नगर परिषदेचे गटनेते तथा कवी युवराज नळे यांनी मांडली. उस्मानाबाद येथे लवकरच याबाबत सर्वपक्षीय राजकारणी मंडळीची बैठक होणार असून रुपरेषा ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *