आजीने आणलेला ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा

खेड शहरात ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली. ढोकळा खाल्ल्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळ होऊ लागली. काही समजण्याच्या आत यापैकी तीन मुलं बेशुद्ध झाली.

  • Tv9Marathi Team
  • Published On - 7:59 AM, 9 Jun 2019
आजीने आणलेला ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा

रत्नागिरी : खेड शहरात ढोकळा खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने पाच लहान मुलांना विषबाधा झाली. ढोकळा खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी घरच्यांकडे केली. त्यानंतर या पाच मुलांपैकी तिघे बेशुद्ध झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही मुलं सुसरी नंबर 2 येथे राहातात. मुलांची आजी शनिवारी (8 जून) सकाळी खेड येथील बाजारपेठेत आली होती. परत जाताने तिने आपल्या नातवंडांसाठी खाऊ म्हणून मिठाईच्या दुकानातून ढोकळा घेतला. घरी गेल्यानंतर तिने मोठ्या आनंदाने हा ढोकळा आपल्या नातवंडांना खायला दिला. नातवंडही ढोकळा बघून आनंदी झाली. त्यांनी तो ढोकळा खाल्ला.

ढोकळा खाल्ल्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळ होऊ लागली. काही समजण्याच्या आत यापैकी तीन मुलं बेशुद्ध झाली. त्यानंतर आजीने ग्रामस्थांच्या मदतीने नातवंडांना खेडच्या कळंबणी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, मुलांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना मदत ग्रुपच्या मदतीने डेरवण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.