माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास

राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 20:59 PM, 21 Jan 2021
माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास

यवतमाळ : 2013 साली महावितरण कार्यालय पांढरकवडा येथील लेखापालास अश्लील शिवीगाळ आणि मारहाणप्रकरणी कानिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार राजू तोडसाम यांना सुनावलेली 3 महिने कारावासाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडाने कायम केल्याने राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली. (Former MLA Raju Todsam Jailed For Three Months)

17 डिसेंबर 2013 ला काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह वीज वितरण कार्यालयात गेले होते, तेथील लेखापाल विलास आकोट यांच्याशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादंवि 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.

कनिष्ठ न्यायालयात सदर प्रकरणी 10 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या

कनिष्ठ न्यायालयात सदर प्रकरणी 10 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आणि 27 नोव्हेंबर 2015 ला राजू तोडसाम यांना कलम 294 मध्ये  3 महिने साधा कारावास आणि 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिने कारावास तर कलम 352 मध्ये 3 महिने साधा कारावास आणि 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 10 दिवस अधिकचा कारावास सुनावला होता, ही शिक्षा सुनावली तेव्हा राजू तोडसाम आर्णी विधानसभा आमदार होते.

राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी

या प्रकरणी तत्कालीन आमदार राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते. या प्रकरणी 3 वर्षांनी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी कनिष्ठ न्यायालय पांढरकवडाचा आदेश कायम ठेवला. आदेश येताच माजी आमदार स्वतःहून पोलीस स्टेशनला आल्याने पांढरकवडा पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.

नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार : राजू तोडसाम

यावेळी शासनातर्फे सरकारी वकील आर. डी. मोरे यांनी तर राजू तोडसाम यांच्यातर्फे ऍड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले, तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते. उद्या आपण नागपूर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. सदर शिक्षेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

यवतमाळचा आढावा : यवतमाळमध्ये भाकरी फिरणार की कायम राहणार?

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ

Former MLA Raju Todsam Jailed For Three Months