कार अडवून फायरिंग, माजी आमदाराच्या मुलाची हत्या

कार अडवून फायरिंग, माजी आमदाराच्या मुलाची हत्या

बेळगाव: माजी आमदार आणि स्वातंत्रसैनिक परशुराम नंदिहळ्ळी यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुरखादारी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याने 49 वर्षीय अरुण परशुराम नंदिहळ्ळी (Arun Nandihalli) यांचा मृत्यू झाला. बेळगाव- धामणे रस्त्यावर मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास, हा थरार पाहायला मिळाला.  या मार्गावर बुरखाधाऱ्यांनी अरुण परशुराम नंदिहळ्ळी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अरुण नंदिहळ्ळी हे मंगळवारी धामणे येथील सासरवाडीला गेले होते. रात्री ते जेवण करुन स्विफ्ट गाडीतून बेळगावला परत येत होते. त्यावेळी धामणे रोडवर अज्ञात तीन व्यक्तींनी गाडी अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून ते फरार झाले.

याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या  हत्येमागे आर्थिक व्यवहार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

धामणे गावापासून जवळच हा खून झाला आहे. अरुण हे विश्व भारत सेवा समितीत होते. त्यांचे वडील परशुराम नंदिहळ्ळी यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील हक्कावरुन वाद सुरु होता. या संस्थेचे अध्यक्ष वडील परशुराम आहेत, तर संचालकपदी अरुण नंदिहळ्ळी होते.

अरुण यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची एक पत्नी अनघोळ या गावात तर दुसरी धामणे या गावात असते. धामणे येथील पत्नीकडे जाऊन जेवण करुन ते परत येत होते. त्यावेळी अरुण यांच्यावर गोळीबार झाला.

अरुण यांना मागील काही दिवसांपासून अज्ञात फोनकॉल येत होते. इतकंच नाही तर त्यांचे लोकेशन शोधण्याचाही प्रयत्न सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *