चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या, पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, केदारी पवार, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची बदली करून त्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आलेय. police officers transferred

  • कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 0:34 AM, 5 May 2021
चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या, पोलीस दलात खळबळ
police officers transferred

मुंबईः राज्यात कोरोनाचं संकट असतानाच पोलीस दलातही फेरबदल करण्यात आलेत. पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, केदारी पवार, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची बदली करून त्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आलेय. अचानक चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानं पोलीस दलातही खळबळ उडालीय. (Four police officers transferred directly outside Mumbai)

पोलीस निरीक्षक केदारी पवार जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र चाचणी समितीत बदली

पोलीस निरीक्षक केदारी पवार हे वर्सोवा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची बदली जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र चाचणी समिती विभागात करण्यात आलीय. तर पोलीस निरीक्षक सचिन कदम हे देवनार पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. त्यांना बदली करून औरंगाबादेतील TRTI कार्यालयात पाठवण्यात आलेय. पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची बदली जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलीय. तसेच सुधीर दळवी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानाविज येथे बदली करण्यात आलीय.

गुन्हे शाखेतल्या अधिकाऱ्याबरोबर यांच्याही बदल्या

विशेष म्हणजे हे अधिकारी बराच काळ गुन्हे शाखेत कार्यरत होते, मात्र काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेतल्या अधिकाऱ्याबरोबर यांच्याही बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गेल्या काही दिवसांपूर्वीही उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण, उद्योजक मनसुख हिरे मृत्यू, सचिन वाझे या प्रकरणांमुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडलेले होते. त्यानंतर पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट सुरू असल्याचे आरोप भाजपने केले. हे सर्व संकटं समोर असताना मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते. तेव्हाही मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

सर्व युनिट प्रमुखांच्या बदल्या

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरू असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनिट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलं होतं. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Four police officers transferred directly outside Mumbai