मुंबई/बीड: स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला भरघोस निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला आता जोपर्यंत महाराष्ट्रात ऊस पिकतो तोपर्यंत निधीची कमतरता भासणार नाही, असे वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)म्हणालेत, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपल्या भावना व्यक्त केल्यात. (Funds will not be reduced as long as sugarcane grows says Dhananjay Munde)
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ऊस गाळपावर प्रत्येक कारखान्यास प्रतिटन 10 रुपये सेस लावण्यात येईल आणि तेवढीच रक्कम राज्य शासन महामंडळाला देईल अर्थात प्रतिटन उसाच्या मागे महामंडळाला 20 रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे याद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी महामंडळ व्यवस्थापनास उपलब्ध होईल, जोपर्यंत ऊस हे पीक राज्यात घेतले जाईल, तोपर्यंत आता ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही, असंही धनंजय मुंडे म्हणालेत.
स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळास आजपर्यंत एक रुपयाही निधी देण्यात आला नव्हता, मागील सरकारच्या काळात अनेक वेळा घोषणा करूनही या महामंडळाच्या रचना किंवा धोरणाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने आता जोपर्यंत ऊस टिकेल तोपर्यंत हे महामंडळ टिकून आणि स्वयंभू राहील, अशी व्यवस्था केल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणालेत.
ऊसतोड कामगार महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे मागून घेतल्यापासून त्याची रचना, धोरण कार्यालय आदी अनेक बाबींवर आम्ही कार्यवाही करत आहोत. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण, सकस आहार, कामगार महिलांची सुरक्षा आदी अनेक बाबींविषयी विविध कल्याणकारी योजना आखण्यात येत आहेत, राज्यात गाळप होणाऱ्या लाखो मेट्रिक टन उसावर आता प्रतिटन 10 रुपये सेस म्हणजेच ऊसतोड कामगार महामंडळास प्रतिटन 20 रुपये प्रमाणे कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, सामाजिक न्याय विभागाच्या अन्य कोणत्याही योजनेच्या निधीला कात्रीही लागणार नाही. विशेष म्हणजे ऊस गाळपावरच से लावल्याने राज्यात जोपर्यंत ऊसाचे उत्पादन घेतले जाते तोपर्यंत हे महामंडळ आता सक्षम राहणार असल्याने आपणास प्रचंड आनंद होत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाविकास आघाडीचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सामाजिक विकासाच्या योजनेंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष विभागास सर्व साधारण योजनांसाठी 2675 कोटी तर अनुसूचित जाती घटक योजनेतून 10635 कोटी अशा एकूण 13310 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सहावीपासून पुढील शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवासी शाळेत एक सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा सुरू करून पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली. याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी विशेष बीजभांडवल योजना, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार योजनांची माहिती देणारे नावीन्यपूर्ण मोबाईल अॅप, अशा अनेक योजनांची घोषणा करण्यात आल्याने सामाजिक न्याय विभागास समृद्धी आणि बळकटी मिळणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणालेत.
संबंधित बातम्या
Maharashtra Budget 2021 highlights | अजित पवारांकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर
Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?
Funds will not be reduced as long as sugarcane grows says Dhananjay Munde