अमेरिकेतील वेस्टर्न लाइफस्टाईल झुगारून डॉ. गेल ऑम्व्हेट महाराष्ट्रात का राहिल्या?; वाचा एका विदुषीची कहाणी

अमेरिकेत जन्मलेल्या गेल ऑम्व्हेट पदव्युत्तर शिक्षणांनंतर वेगवेगळ्या चळवळींच्या अभ्यासाच्या निमित्तानं भारतात पर्यायानं महाराष्ट्रात आल्या.

अमेरिकेतील वेस्टर्न लाइफस्टाईल झुगारून डॉ. गेल ऑम्व्हेट महाराष्ट्रात का राहिल्या?; वाचा एका विदुषीची कहाणी
गेल ऑम्व्हेट यांचा एका कार्यक्रमातील फोटो ( भारत पाटणकर यांच्या फेसबूकवरुन)

मुंबई: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, जेष्ठ संशोधक -लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. अमेरिकेत जन्मलेल्या गेल ऑम्व्हेट पदव्युत्तर शिक्षणांनंतर वेगवेगळ्या चळवळींच्या अभ्यासाच्या निमित्तानं भारतात पर्यायानं महाराष्ट्रात आल्या. डॉ. गेल ऑम्व्हेट यांना क्रांतिविरांगना इंदूताई पाटणकर भेटल्या. गेल ऑम्व्हेट यांनी महाराष्ट्रात अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला.

गेल ऑम्व्हेट भारतात कशा आल्या?

डॉ. गेल ऑम्व्हेट या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.

गेल ऑम्व्हेट यांचा महात्मा फुलेंच्या चळवळीवर सविस्तर अभ्यास

गेल ऑम्व्हेट यांच्या इतका महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.

डॉ. भारत पाटणकर यांची जीवनसाथी म्हणून निवड

डॉ. गेल या अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ गेल आणि डॉ भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला.

विविध चळवळीत सहभाग

पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या.

गेल ऑम्व्हेट यांची पुस्तके

डॉ. गेल ऑम्व्हेट यांची पंचवीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फुले- आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख पदासह इतर मान्यवर शैक्षणिक संस्थामंध्ये काम केलं आहे.

डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची , जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.

इतर बातम्या:

डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट यांचं निधन

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

Gail Omvedt international scholar activist passes away know about her journey from America to India

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI