गोंदियात वाघाची शिकार करून अवयव शेतशिवारात फेकले; पंजे आणि डोकं गायब

वन अधिकाऱ्यांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून काही अवयवाचा शोध घेत एकत्र केले. मात्र वाघाचे पंजे आणि डोके अजूनही सापडलेले नाही.

  • शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया
  • Published On - 15:34 PM, 16 Nov 2020

गोंदियाः गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चुटिया आणि लोधीटोला गावाच्या शेतशिवारात जंगली डुकरांची शिकार करण्याकरिता लावून ठेवलेल्या विजेच्या तारेत अडकून एका तीन वर्षांच्या वाघाचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वाघाचे तुकडे करीत परिसरातील शेतशिवारात फेकून दिले. शेतात भात कापणाऱ्या लोकांना याची दुर्गंधी येताच ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून काही अवयवांचा शोध घेत एकत्र केले. मात्र वाघाचे पंजे आणि डोके अजूनही सापडलेले नाही. (Gondia Hunts Tigers And Dumps Organs On Farms)

गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या चुटिया आणि लोधीटोला गावाला लागून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा आहे. या भागात नेहमीच वन्यजीवांचा वावर असतो. मात्र हव्या त्या प्रमाणात जंगलात वनविभागाकडून गस्त घातली जात नसल्याने या भागात जंगली डुक्कर आणि चितळांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असते. विजेचा शॉक देऊन अशा प्राण्यांची शिकार केली जाते. अशाच जंगली डुकरांच्या शिकारीकरिता विजेच्या जिवंत तारा सोडून तीन वर्षांच्या वाघाचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

आरोपीने ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून धारदार शस्त्राने वाघाचे तुकडे करीत परिसरातील शेतशिवारात फेकून दिले. सध्या भात कापणीचे दिवस असल्याने अनेक जण शेतात राबत असतात. शेतात राबत असलेल्या काहींना दुर्गंधी यायला लागल्यानं शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. वन अधिकऱ्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून वाघाचे काही अवयव शोधून काढले. मात्र अजूनही वाघाचे डोके आणि दोन पंजे मिळू शकले नाहीत. वन अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत.

तर या आधी देखील याच भागात अनेकदा वन्यजीवांच्या शिकारी झाल्या आहेत. वनविभागाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नसल्याने शिकाऱ्यांकडून वन्य जीवांच्या हत्येचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके वाघ असलेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात एका वाघिणीची शिकार करण्यात आली होती. विशेष म्हणजे ताडोबाच्या इतिहासात कोअर क्षेत्रात वाघाच्या शिकारीची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे वनविभागाला मोठा धक्का बसला होता. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या खातोडा गेट परिसरात ही घटना उघडकीस आली होती. ताडोबातील हा भाग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नाही. मात्र कोअर क्षेत्रात तारांचा फास लावून वाघिणीची शिकार करण्यात आल्याचं उघड झालं होतं.  सर्वात संरक्षित वन क्षेत्रात वाघिणीची शिकार झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला होता.

संबंधित बातम्या

सापळा लावून वाघीण मारली, ताडोबात वाघिणीच्या शिकारीने खळबळ

यवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण

(Gondia Hunts Tigers And Dumps Organs On Farms)