Gondia Forest | पूर्व विदर्भात हंगाम तेंदुपत्ता संकलनाचा, गोंदियात कोट्यवधींची उलाढाल; 45 हजार कुटुंबांना रोजगार

Gondia Forest | पूर्व विदर्भात हंगाम तेंदुपत्ता संकलनाचा, गोंदियात कोट्यवधींची उलाढाल; 45 हजार कुटुंबांना रोजगार
पूर्व विदर्भात हंगाम तेंदुपत्ता संकलनाचा

या तेंदुपत्ता संकलनातून रोजगाराशिवाय कोट्यवधी रुपयाची उलाढाल एकट्या गोंदिया जिल्ह्यातून होते. यातून रोजगार मिळत असल्याचं मजूर चंद्रशेखर बडोले व मोजणी करणारे परसराम जांभुळकर यांनी सांगितलं.

शाहिद पठाण

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 13, 2022 | 6:28 PM

गोंदिया : पूर्व विदर्भातील ( East Vidarbha) गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनोपज आहेत. यातून दरवर्षी अनेकांना रोजगार ( Employment) प्राप्त होतो. सध्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता तोडण्याची लगबग सुरू आहे. यातून वन विभागामार्फत तब्बल 30 कोटींहून अधिकची उलाढाल होणार आहे. रणरणत्या मे महिन्यात ग्रामस्थांची मोठी लगबग सुरू आहे. भल्या पहाटे उठून गावकरी जंगलालगत असलेल्या तेंदूपत्याची तोडणी करतात. त्याचे संकलन करण्यात काम ते करीत आहे. त्यामुळं तेंदूपत्त्याच्या (Tendupatta) संकलनातून भर मे महिन्यातही त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. तेंदूपत्त्याचा विचार केला असता पूर्व विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या ठिकाणी अभयारण्यालगत तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या चारही जिल्ह्यातून उत्कृष्ट तेंदूपत्ता म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तेंदूपत्त्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे दर हंगामात मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते. तेंदूपत्त्यांचे आणखी विशेष म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटी त्याची कोवळी पाने झाडाला लागतात. मे महिन्यात त्याची तोडणी सुरू होते. साधारणतः एक महिना चालणाऱ्या या तोड्यातून अनेक ग्रामस्थांना यातून रोजगार प्राप्त होतो.

लिलाव ऑनलाईन पद्धतीने

सदर प्रक्रिया ही ऑनलाईन लिलाव पद्धतीने होते. यामध्ये तेंदूपत्ता कंपन्या वनविभागाकडे दहा टक्के अमानत रक्कम जमा करतात. संबंधित तालुक्यातील कंत्राट दरवर्षी घेत असतात. उर्वरित रक्कम ही प्रत्येक महिन्याला 30 टक्के या प्रमाणे एकूण तीन महिन्यांत अदा करावी लागते. ठेकेदारांच्या माध्यमातून स्थानिकांना तेंदूपत्ता संकलनाचे काम देण्यात येते. यामध्ये त्यांना 100 पुड्या मागे 350 रुपये एवढा दर देण्यात येतो. जर 100 पुड्यांचा विचार केला असता एका पुड्यात 70 पाने असतात. एकूण 100 पुड्याप्रमाणे त्यांना 7 हजार तेंदूची पाने एकत्रित केली जातात. अशापद्धतीने त्याची साठवणूक केल्या जाते. या तेंदुपत्ता संकलनातून रोजगाराशिवाय कोट्यवधी रुपयाची उलाढाल सुद्धा या कालावधीत एकट्या गोंदिया जिल्ह्यातून होते. यातून रोजगार मिळत असल्याचं मजूर चंद्रशेखर बडोले व मोजणी करणारे परसराम जांभुळकर यांनी सांगितलं.

29 संकलन केंद्राचा लिलाव

जिल्ह्यात वनउपज असल्यामुळे येथील ग्रामस्थांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. मार्च महिन्यात मोहफूल व त्यानंतर लगबग सुरु होते ती तेंदूपत्ता संकलनाची. आज एकट्या तेंदूपत्त्याच्या उपलब्धतेमुळे येथील तब्बल 45 हजारांहून अधिक कुटुंबाना रोजगार प्राप्त झाला आहे. शिवाय त्यांना 100 पुड्यातून दर दिवसाला 350 रुपये तर मिळतातच. शिवाय लिलाव प्रक्रियेतून प्राप्त झालेला वन विभागाच्या एकूण महसुलापैकी साधारणतः 70 ते 80 टक्के महसूल हा त्या मजुराचा खात्यात बोनसच्या रूपात केलेल्या संकलनाप्रमाणे जमा होतो. मागील वर्षीचा विचार केला असता एकूण 29 संकलन केंद्राचा लिलाव हा खाजगी कंत्राटदाराला 12. 62 कोटी इतका होता तर यावर्षी यात तिप्पट वाढ होऊन तो 34.32 कोटी इतका झाला आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्त्याला स्थानिक व्यापाऱ्याकडून चांगलीच मागणी दिसून येते, असे तेंदुपत्ता विकणारे मोहन गाडवे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें