पायाने दिव्यांग, हिऱ्याला पैलू पाडण्याचा अनुभव, पुण्यात दुकान फोडणाऱ्या गुजराती चोरट्याला अटक

पुण्यात दुकान फोडून दीड लाख रुपयांची चोरी केल्या प्रकरणी एका आगळ्यावेगळ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे (Handicapped Gujrati theft arrest).

  • अश्विनी सातव-डोके, टीव्ही9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:16 AM, 8 Dec 2019
पायाने दिव्यांग, हिऱ्याला पैलू पाडण्याचा अनुभव, पुण्यात दुकान फोडणाऱ्या गुजराती चोरट्याला अटक

पुणे : पुण्यात दुकान फोडून दीड लाख रुपयांची चोरी केल्या प्रकरणी एका आगळ्यावेगळ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे (Handicapped Gujrati theft arrest). संबंधित चोरटा पायाने दिव्यांग आहे. त्याला गुजरातमधील हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या कारखान्यात कामाचा अनुभव देखील आहे. विशेष म्हणजे चोरीनंतर संबंधित चोरटा आपल्या घरी गुजरातला पळून गेला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत त्याच्या मुसक्या आवळल्या. विजयभाई जिलिया (वय 20, रा. नवसारी, गुजरात) असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे (Handicapped Gujrati theft arrest).

पुण्यातील रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकामध्ये “न्यु हॅलो मोबाईल शॉपी’ हे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम व मोबाईल असा दिड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना 30 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिव्यांग असल्याचे निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. त्यावेळी तो पुणे स्टेशनच्या दिशेने गेल्याचे आणि तेथून पुढे मुंबईला गेल्याचं दिसलं. त्यानंतर, पोलिसांनी मुंबई येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी तो रेल्वेने गुजरातला निघून गेल्याचे निदर्शनास आले.

पोलिस सीसीटीव्ही चित्रीकरण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे गुजरातमधील नवसारी येथे पोहचले. त्यानंतर आरोपी तेथील दुर्गम भागातील एका ओढ्याच्या काठावरील झोपडीमध्ये राहात असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी आरोपीला तेथून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे आरोपी चोरटा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. त्याने गुजरातमधील एका हिऱ्याला पैलू पाडण्याच्या कारखान्यात काही वर्ष काम केलं. तेथून तो पुण्यात आला आणि त्याने थेट दुकान फोडून दीड लाख रुपयांची चोरी केली. समर्थ पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.