राज्यात मुसळधार पाऊस सुरुच, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी

Heavy rain in Maharashtra holidays for schools, राज्यात मुसळधार पाऊस सुरुच, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे राज्यात कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारासह बेळगावमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती तयार झाल्याने येथील महाविद्यालये आणि शाळांना मंगळवार आणि बुधवार (6, 7 ऑगस्ट) अशी 2 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे शिरोळे आणि हातकणंगले तालुक्यात पूर परिस्थिती तयार झाली आहे. कृष्णा पंचांग संगमावर तर अगदी बेटाचे स्वरुप आले आहे. सर्वच धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. सातारा जिल्ह्यातही माण तालुका वगळून आपत्कालीन आणि पूर सदृश्य स्थिती लक्षात घेत मंगळवारी (6 ऑगस्ट) शाळांना सुटटी असेल. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक, माध्यमिक शाळांसह उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पुण्यातील सर्व शाळांना देखील मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे मौसम नदीला पूर आल्याने मालेगाव मनपा उपायुक्तांनी मंगळवारी सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली. बेळगावमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे. पुलांवर आलेल्या पाण्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगाव आणि चिक्कोडी जिल्ह्यातील (रामदुर्ग तालुका वगळता) सर्व शाळांना मंगळवारी आणि बुधवारी (6 व 7 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडमध्ये देखील पाऊस सुरु आहे. मात्र, तेथील शाळांना अद्याप सुट्टीचा कोणताही निर्णय झालेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. मात्र, येथे पुरजन्य परिस्थिती नसल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली नाही. मात्र, अतिवृष्टीमुळे शाळेत जाताना-येताना धोकादायक स्थिती असल्यास त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सुट्टी देण्याचे अधिकार दिल्याचीही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

गोवा, कोकण, कोल्हापूर वाहतूक ठप्प, संपर्क तुटणार

आजरा शहराजवळील व्हिक्टोरिया या ब्रिटिशकालीन पुलावरची वाहतूक सोमवारी (5 ऑगस्ट) दुपारी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोवा, कोकण, कोल्हापूर येथील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्याचा संपर्क तुटणार आहे. हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 130 वर्षात पहिल्यांदा हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल 1889 मध्ये बांधला गेला आहे. शासनाने खबरदारी म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि कोकणातील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने हा पुल बंद करण्याचा निर्णय घेतला.

पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. याचा फटका भिवंडी, वाडा, खोडाळा, नाशिक दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक 34 वरील वाहतुकीला बसला. या मार्गावर संपूर्ण डोंगर खचून पूर्ण भराव रस्त्यावर आल्याने महामार्ग पूर्णपणे बंद झाला. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी मोठा कालावधी लागणार असून या मार्गावरची वाहातूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *