'माझ्यामुळे सर्वांना त्रास, मला गोळ्या झाडा', हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची मागणी

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विक्की नगराळे याने त्याला गोळ्या मारण्याची मागणी केली आहे.

'माझ्यामुळे सर्वांना त्रास, मला गोळ्या झाडा', हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची मागणी

वर्धा : हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. राज्य सरकारने देखील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वतः आरोपी विक्की नगराळे यानेही त्याला गोळ्या झाडून मारण्याची मागणी केली आहे (Hinganghat accused demand to shoot). सुरुवातीला आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती. मात्र, ही माहिती मिळताच त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याचं म्हणत गोळ्या मारण्याची मागणी केली. लोकभावनेच्या दबावातून त्याने ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.

आरोपी विक्की नगराळेला सध्या वर्धा शहरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक पाच मध्ये ठेवण्यात आलं आहे. आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बॅरेकमधील काही कैद्यांना स्थलांतरित करण्यात आलं. सुरवातीला या बॅरेकमध्ये 12 ते 15 कैदी होते. त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ 5 कैदी ठेवण्यात आले. यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं वर्तन असणाऱ्या कैद्यांना प्राधान्य देण्यात आलं. एका निवृत्त पोलीस निरीक्षकाचा देखील या कैद्यांमध्ये समावेश आहे.

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे 4 दिवस पोलीस कोठडीत, तर 4 दिवस वर्धा कारागृहात होता. यानंतर 20 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी मागणी वर्धा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील 5 साक्षीदारांची ओळख परेड हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहात पार पडली. यावेळी 2 सरकारी पंच उपस्थित असल्याची सुत्रांनी माहिती दिली. तब्बल 1 तास ही ओळख परेडची प्रक्रिया चालली. यानंतर या आरोपीला कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने नागपूर येथील कारागृहात हलवण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी कारागृहात असणाऱ्या आरोपीलला याची माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (11 जानेवारी) आरोपी विक्की नगराळे याला ही माहिती मिळाली. यानंतर तो काही काळ निशब्ध होऊन कारागृहात उभा राहिला आणि नंतर बॅरेकमध्ये आपल्या पलंगावर बसला. मात्र काही वेळेनंतर त्याच्या चेहऱ्यावर घटनेबाबत कोणतेही दुःख दिसले नाही. मात्र, नियमित झडती दरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय, असं म्हणत मला गोळी झाडून मारा, अशी मागणी केली.

पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पोहचलेल्या आरोपीच्या सुरक्षेचा तणाव जिल्हा प्रशासन, कारागृह प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यावर दिसून येत होता. त्यामुळेच दिवसाला 5 आणि रात्रीला 3 पोलिसांचा तुरुंगाबाहेर खडा पहारा लावण्यात आला होता. शिवाय कारागृहासमोर तात्पुरती पोलीस चौकी आणि शहरातील पेट्रोलिंग वाढवण्यात आली होती.

हिंगणघाटच्या घटनेनंतर आरोपीचा हैद्राबादसारखा गोळ्या झाडत एन्काउंटर करा अशीही मागणी केली जात आहे. दुसरीकडे मला गोळ्या झाडा अशी मागणी स्वतः आरोपीनेच कारागृहात केली. असं असलं तरी आरोपीची ही मागणी पश्चातापाच्या भावनेतून नाही, तर आपल्या विरोधातील जनभावनेच्या दबावातून आल्याचंही बोललं जात आहे. सर्वच स्तरातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे न्यायलयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा कधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

संबंधित व्हिडीओ :


Hinganghat accused demand to shoot him

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *