चंद्रपुरातील ‘या’ ग्रामपंचायतीबाबत ऐतिहासिक निर्णय; ग्रामस्थांच्या लढ्याला यश

नगरविकास विभागाने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देत असल्याचा अध्यादेश निर्गमित केलाय.

  • निलेश डहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 21:28 PM, 31 Dec 2020
चंद्रपुरातील 'या' ग्रामपंचायतीबाबत ऐतिहासिक निर्णय; ग्रामस्थांच्या लढ्याला यश

चंद्रपूर : शहरालगत घुग्घुसवासीयांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश आलंय, घुग्घुस नगर परिषद  (Ghughus Village) निर्माण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. नगरविकास विभागाने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देत असल्याचा अध्यादेश निर्गमित केलाय. घुग्घुस ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत एकही उमेदवारी अर्ज दाखल न करता घुग्घुसवासीयांनी सरकारविरुद्ध ऐतिहासिक एकजूट दाखवली होती. तसेच तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Historical Decision Regarding Ghughus Gram Panchayat In Chandrapur)

चंद्रपूर शहरालगत घुग्घुसवासीयांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश आलेय. घुग्घुस नगर परिषद निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्याच्या नगरविकास विभागाने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देत असल्याचा आदेश निर्गमित केलाय. राज्यभर सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत, त्यातच घुग्घुस ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र नगर परिषद स्थापन करा, अशी मागणी करत एकही उमेदवारी अर्ज दाखल न करता घुग्घुसवासीयांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते-नेत्यांनी सरकारविरुद्ध ऐतिहासिक एकजूट दाखविली होती. घुग्गुस शहरात या निर्णयाचे स्वागत होत असून, सध्या नगर परिषद स्थापनेपर्यंत चंद्रपूरच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

घुग्घुस गावाकडून एकीचं दर्शन

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या औद्योगिक शहरातील नागरिकांनी अनोख्या एकीचे दर्शन घडवले. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. 25 वर्षांपासून या शहरात नगर परिषद स्थापनेची मागणी आहे. मात्र, ती पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी हे पाऊल उचलले. जिल्हा प्रशासनाने ही या बद्दलचा अहवाल निवडणूक आयोगाला कळवला आहे.

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या औद्योगिक नगरी घुग्घुस शहरात नगरपरिषद स्थापनेसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी एकजुट झाले आहेत. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस हे शहर कोळसा- सिमेंट आणि कच्च्या लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमुळे व त्याच्या प्रदूषणामुळे सतत चर्चेत असते. (Ghughus village of Chandrapur)

नगर परिषदेसाठी 25 वर्षे लढा

गेली 25 वर्षे इथले नागरीक नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून संघर्ष आणि चळवळ करत होते. 31 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शहरात नगरपरिषद स्थापनेसाठी प्राथमिक अधिसूचना जारी केली होती. नगरपरिषद स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असतानाच नुकत्याच राज्य शासनाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रमात घुग्घुसचाही समावेश करण्यात आला. राज्य सरकारच्या या अन्यायी धोरणामुळे संतापलेल्या घुग्घुसकरांनी निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारले. 24 डिसेंबरपासून विविध आंदोलनांची मालिका राबवून त्यांनी आपली मागणी रेटून धरली. घुग्घुस शहराच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगरपरिषद स्थापन करा, अशी अधिकृत भूमिका जाहीर केली. पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या रंजीता आगदारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, घुग्घुस ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपेंपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत आता प्रशासकाच्या अधीन राहणार आहे. सर्वपक्षीय बहिष्कारामुळे उदभवलेली स्थिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला कळविली आहे, अशी माहिती चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गोंड यांनी सांगितले. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झालाय. मात्र, घुग्घुसकरांनी ठाम निर्धार करत नगर परिषद स्थापनेसाठी एकजूट दाखवलीय. राज्य सरकार याची कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

सर्वत्र ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरु, चंद्रपूरच्या घुग्घुस गावाचा बहिष्काराचा निर्णय, काय कारण?

राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?

Historical Decision Regarding Ghughus Gram Panchayat In Chandrapur