राम मंदिरासाठी ‘विहिंप’चा नागपुरात ‘हुंकार’

  • Sachin Patil
  • Published On - 12:24 PM, 25 Nov 2018

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर : अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे याकरिता विश्व हिंदू परिषदेतर्फे आज नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ही सभा आयोजित करण्यात आल्याने पूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी 3 वाजता या सभेला सुरवात होणार आहे.

अनेक वर्षांनंतर नागपुरात राम जन्मभूमीबाबत साध्वी ऋतंभरा यांचे भाषण होणार आहे. तसेच ज्योतिष पीठाचे स्वामी वासुदेवानंद, विदर्भातील संत स्वामी जितेंद्रनाथ महाराज या सभेतील प्रमुख वक्ते राहणार आहेत. तर विदर्भातील विविध धर्म संप्रदायांच्या प्रमुख आणि संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सभेला विदर्भासह शेजारच्या राज्यातील सुमारे एक लाख भक्त सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला.

सभास्थळी व परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

रविवारी होणाऱ्या ‘हुंकार’ सभेनिमित्त शहराच्या विविध भागांत हातात भगवा झेंडा व ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत प्रभातफेरी व रॅली काढून जनजागरण करण्यात आले. हुंकार सभेमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पूर्व नागपुरातील पारडी व अन्य भागात रॅली काढण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्यायात्रेवर आहेत. नागपुरातूनही सुमारे एक हजार कार्यकर्ते तेथे पोहोचले आहेत. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वाखाली शंभर कार्यकर्त्यांचा जत्थाही सध्या अयोध्येत आहे. तर नागपुरात सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाल परीसरातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. हातात भगवा घेऊन ‘हर हिंदू का नारा हैं, पहले मंदिर फिर सरकार’, ‘मंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा देत कार्यकर्ते राम मंदिराकडे निघाले. सायंकाळी शरयू नदीच्या तिरावर ठाकरे यांची आरती सुरू असताना थाडेश्वर राम मंदिरासमोर शिवसैनिकांनी महाआरती केली.

श्रीराम जन्मभूमी स्थळी सोमनाथच्या धर्तीवर राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने रविवारी नागपूरसह अयोध्या आणि बेंगळुरू येथे ‘हुंकार सभा’ आयोजित केल्या आहेत.

दोन महिन्यांपासून सभेची तयारी :

विहिंपने सुमारे दोन महिन्यांपुर्वीच या सभेची करण्यास सुरवात केली होती. त्यासाठी आयोजन समितीसह विविध समित्यांची स्थापनाही केली गेली. या माध्यमातून जनजागरण आणि वातावरण निर्मिती करण्यात आली. शहरातील बहुतांश मंदिरांवर हुंकार सभेचे फलक लावून यात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. विहिंपचे नेते चंद्रकांत ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली १४६ सदस्यांची स्वागत समिती तर, संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली १११ सदस्यांची आयोजन समिती तयार करण्यात आली.