मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेकांच्या झोपा उडाल्या : खडसे

मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेकांच्या झोपा उडाल्या : खडसे

जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असे पाहिले पाहिजे की चांगल्या चांगल्यांच्या झोपा उडाल्या पाहिजे. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोपा उडाल्या, अशा प्रकारचं उदाहरण देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठं होण्याचं स्वप्न पाहण्याचा सल्ला विदयार्थ्यांना दिला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि गुरुनाथ फाउंडेशनच्या वतीने भुसावळ येथे झालेल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

जीवनाचे ध्येय निश्चित करताना विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचे स्वप्न पाहणे आवश्यक असल्याचं खडसेंनी म्हटलंय. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला देत खडसेंच्या मनातली खदखद पुन्हा एकदा बाहेर आली. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली. यानंतर खडसेंनी अनेकदा मनातली खदखद बोलून दाखवली आहे.

भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले एकनाथ खडसे यांना सध्या पक्षाने साईडलाईन केल्याचं चित्र आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या कोणत्याही बैठकीसाठी ते दिसत नाहीत. पक्षाविषयीची नाराजी त्यांनी या अगोदर अनेकदा बोलून दाखवलेली आहे. त्यांना काँग्रेसने ऑफरही दिली होती. पण आपण पक्ष कधीही सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टही केलं होतं.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसेंना क्रमांक दोनचं पद देण्यात आलं होतं. पण नंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

जळगाव, रावेरमध्ये तिकीट कुणाला?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलंय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळते, की खडसे गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळते याविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही चर्चा रंगत आहे. या विषयवार बोलताना खडसे यांनी म्हटले की, “संसदीय बोर्ड उमेदवारी देण्याचा निर्णय घेताना कोण कोणाचा यावर निर्णय घेत नाही, तर उमेदवाराचं काम, त्याची निवडून येण्याची क्षमता पाहून, लोकशाही मार्गाने निर्णय घेतला जात असल्याने अशा प्रकारच्या चर्चांना कोणताही अर्थ नाही.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *