आयर्लंडचे पंतप्रधान कोकणातील मूळगावी, कुटुंबीयांसह मालवणी जेवणाचा आस्वाद

सातासमुद्रपार मराठीचा झेंडा रोवणारे कोकणचे सुपुत्र आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आज (29 डिसेंबर) कोकणातील मालवण तालुक्यात त्यांच्या मुळगावी वराडमध्ये आले (Ireland PM Leo Varadkar in Kokan).

आयर्लंडचे पंतप्रधान कोकणातील मूळगावी, कुटुंबीयांसह मालवणी जेवणाचा आस्वाद

सिंधुदुर्ग : सातासमुद्रपार मराठीचा झेंडा रोवणारे कोकणचे सुपुत्र आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आज (29 डिसेंबर) कोकणातील मालवण तालुक्यात त्यांच्या मूळगावी वराडमध्ये आले (Ireland PM Leo Varadkar in Kokan). आपल्या वडिलांच्या इच्छेखातर ते सहकुटुंब या खासगी दौऱ्यावर आले. यानंतर वराडकरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. लिओ यांचं गावात आगमन झाल्यावर वराडवासीय अक्षरशः भरवून गेले. आमच्या गावची एक व्यक्ती थेट आयर्लंडच्या पंतप्रधान पदावर बसली. यापेक्षा वेगळा तो आनंद काय अशा भावना यावेळी वराडमधील प्रत्येकजण व्यक्त करत होता (Ireland PM Leo Varadkar in Kokan).

विशेष म्हणजे लिओ वराडकर वराड गावातील ग्रामदैवत वेताळ मंदिरात आले, तेव्हा त्यांची ढोलताशा वाजवत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी थेट मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालून पंतप्रधान होण्याअगोदरचा त्यांचा ग्रामदेवतेला केलेला नवस फेडला. यावेळी मंदिरात प्रवेश केल्यावर लिओ यांनी भारतीय परंपरेनुसार देवळातील घंटा वाजवून मंदिरात प्रवेश केला. तसेच वेतोबाला पुष्पहार घालून गाऱ्हाणं सुरू असताना हातही जोडले. हे पाहून अनेकांना कौतुक वाटलं. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर गावात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी वराडवासीयांनी मोठी गर्दी केली होती.

वराडकरांचं आयरिश नर्ससोबत प्रेमविवाह 

आपल्या या दौऱ्यात लिओ यांनी मालवणी जेवणाचा सहकुटुंब आस्वाद घेतला. तसेच वराडचे ग्रामदैवत देव वेतोबाचे सहकुटुंब दर्शनही घेतलं. लिओचे वडील डॉक्टर अशोक वराडकर हे 1960 ला इंग्लडला गेले. ते तेथील सरकारी सेवेत डॉक्टर म्हणून रुजू झाले. बर्कशायर परगण्यातील स्लाव्ह या गावी त्यांचं आणि तेथील रुग्णालयाच्या एका नर्सचं प्रेम झालं. यानंतर त्यांनी मिरियम या आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं.

लग्नानंतर ते दोघेही आयर्लंडलाच स्थायिक झाले. त्यांनी तेथेच आपला दवाखाना सुरू केला. या दाम्पत्याच्या पोटी लिओ वराडकरांचा जन्म झाला. याच लिओनं लहानपणी आयर्लंडचा आरोग्यमंत्री होण्याचं स्वप्न बाळगलं. पुढे ते स्वप्न सत्यात उतरवत लिओ आरोग्यमंत्रीही झाले. मात्र, त्यांनी येथेच न थांबता आपल्या कामाच्या जोरावर थेट आयर्लंडच्या पंतप्रधानपदालाही गवसणी घातली.

वराडकरांच्या जुन्या आठवणींना नवा उजाळा

वराड गावात आल्यानं लिओ यांचे वडील अशोक वराडकर यांच्या जुन्या आठवणींना नवा उजाळा मिळाला. पंतप्रधान लिओ वराडकर वराडमध्ये आल्याने वराड गावात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर आणि चुलत भाऊ वसंत वराडकर यांनीही यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्रातील कोकणात राहणारा माणूस कुठेही वास्तव्य करो. मात्र त्यांची कोकणाशी जुळलेली नाळ कधीच तुटत नाही. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे लिओ वराडकर. भलेही लिओ वराडकर यांचा जन्म आर्यंलडमध्ये झाला असेल, मात्र त्याचं वडिलांचं मूळ गाव कोकणातच. अखेर वडिलांच्या इच्छेखातर का होईना लिओ वराडकर कोकणात आले. त्यानंतर कोकणवासीयांनी त्यांचं केलेलं स्वागत मात्र ते नेहमीच लक्षात ठेवतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *