कोल्हापूरच्या महापौरपदी महाविकास आघाडीच्या निलोफर आजरेकर, 48-1 ने विजय!

भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळालं, तर काँग्रेस नगरसेविका निलोफर आजरेकर यांना 48 मतं पडली.

Kolhapur Mayor Nilopher Ajarekar, कोल्हापूरच्या महापौरपदी महाविकास आघाडीच्या निलोफर आजरेकर, 48-1 ने विजय!

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड (Kolhapur Mayor Nilopher Ajarekar) झाली आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या बहुतांश नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने आजरेकर यांनी 48-1 ने निर्विवाद विजय मिळवला.

निलोफर आजरेकर यांना कोल्हापूरच्या 50 व्या महापौर होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेतील संख्याबळ पाहता आजरेकर यांच्या निवडीची घोषणा केवळ औपचारिकता होती. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळालं, तर आजरेकर यांना 48 मतं पडली.

महापौर निवडीसाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. एकमेव उपस्थित सदस्य कमलाकर भोपळे यांनी अर्चना पागर यांच्यासाठी मतदान केल्याने त्यांना एकच मत मिळालं. निलोफर आजरेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केलं.

याआधी, अॅड. सुरमंजिरी लाटकर कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत राजीनामा देत महापौरपदावरुन पायउतार झाल्या होत्या. अवघ्या सव्वादोन महिन्यात सुरमंजिरी लाटकर यांनी पद सोडलं होतं. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाआघाडी करत पहिला विजय कोल्हापुरात मिळवला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून इथे आघाडी आहे.

कोल्हापूर महापालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचं वर्चस्व होतं. मात्र पक्षीय राजकारण आल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघडीची मोट बांधत सत्ता संपादन केली होती. त्याला शिवसेनेचीही साथ मिळाली.

नगरसेवक सांभाळण्यासाठी महापौरपदाचे तुकडे पाडून कोल्हापुरात दर तीन किंवा सहा महिन्याला महापौर बदलला जात आहे. सुरमंजिरी लाटकर यांना केवळ दोन महिनेच महापौरपद अनुभवायला मिळालं. काही महिन्यांनी होणाऱ्या बदलामुळे पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होते.

कोल्हापूर महापालिकेचा इतिहास 

  • 1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली.
  • नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर होते.
  • 1978 पासून आतापर्यंत 49 महापौरांनी कार्य़भार सांभाळला
  • गेल्या 10 वर्षात 15 महापौर करवीरवासियांनी पाहिले
  • 2018 पासून आतापर्यंत तब्बल 5 महापौर बदलण्यात आले आहेत.
  • महापौरपदाबरोबरच आता स्थायी समिती सभापतीपदाच्या खांडोळीचाही प्रघात मागच्या वर्षीपासून पडला आहे.

Kolhapur Mayor Nilopher Ajarekar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *