
प्रत्येक आई-वडिलांसाठी आपली मुलं म्हणजे जीव असतो. पण त्याच मुलांची मुलं, म्हणजेच नातवंड हा तर त्यांच्या काळजाचा तुकडा असतो. नातवंडं ही दुधावरची साय असतात असंही म्हटलं जातं. नातवंडांच्या प्रेमासाठी, त्यांच्या आनंदापायी आजी-आजोबा काहीही करू शकतात. याचंच एक जितं-जागत उदाहरण सांगलीमध्ये दिसलं. तिथे आजोबा आणि इतर नातेवाईकांसोबत गवत आणण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलावर बिबट्याने हल्ला करत झडप घातली आणि तो त्याला शेतात घेऊन गेला. पण त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आजोबांनी जीव धोक्यात घालून बिबट्याशी झुंज दिली आणि नातवाचा जीव वाचवून त्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवून आणलं. बजरंग मुळीक असे धाडसी आजोबांचे नाव असून आरव असे नातवाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जीव धोक्यात घालून बिबट्याशी भिडले आजोबा
मिळालेल्या माहितीनुसार, आजोब बजरंग मुळीक हे आपला नातू आरव सोबत गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्यासोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक हे लोकं देखील उपस्थित होते. मात्र ते चालत असतानाच एका झाडाआड लपलेला बिबट्या अचानक समोर आला आणि डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच त्याने छोट्या आरववर झडप घातली. आणि तो त्याला उसाच्या शेतात फरपटत घेऊन गेला.
हे पाहून सगळेच घाबरले, मोठा गोंधळ उडाला. मात्र आजोबांनी धाव घेतली आणि बिबट्याशी झुंज देत छोट्या आरवची सुखरूप सुटका केली. त्याला बिबट्याच्या तावडीतुन सोडवून आणलं. त्यानंतर बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी आरवला लगेच मोटरसायकलवर बसवून उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच या संपूर्ण घटनेची माहिती वनविभागाला दिली. चिमुरड्या आरवच्या गळ्यावर, छातीवर बिबट्याने 17 ठिकाणी ओरबाडले आहे. त्याच्या रडण्याने त्याचे वडील, आजोबा यांना रडू कोसळले. अखेर उपजिल्हा रुग्णालयात आरव याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला पुढील उपचारांसाठी कराड येथे दाखल करण्यात आले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले असून गावकरी दहशतीखाली जगत आहेत.