चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या महिलेला बिबट्याने ओढून नेलं

अंगणात झोपलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात घडली आहे.

चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या महिलेला बिबट्याने ओढून नेलं

चंद्रपूर : दोन दिवसांपासून चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अंगणात झोपलेल्या एका महिलेवर काल (6 जून) बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. गयाबाई हटकर (65) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गडबोरी गावातील घराच्या अंगणात गयाबाई हटकर झोपल्या होत्या. काल मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने त्यांना 500 मीटर दूर जंगलात फरफटत नेले. त्यानंतर या बिबट्याने त्यांच्या शरीराचे लचके तोडले. दरम्यान यानतंर सकाळी गावकऱ्यांनी गयाबाई दिसल्या नाहीत, म्हणून त्यांची शोधाशोध सुरु केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर गावकऱ्यांना त्यांच्या शरीराचे काही तुकडे जंगल परिसरात सापडले.

दरम्यान रविवारी (2 जून) याच परिसरातून एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळीही अशाप्रकारे या मुलाला बिबट्याने उचलून गावाकडच्या जंगलात नेलं होतं. या घटनेनंतर वनविभाग आणि पोलिसांनी गावालगत पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार बुधवारी (5 जून) एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं होतं.

मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे या परिसरात आणखी काही बिबटे असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. दरम्यान सलग दोन घटनांनी सिंदेवाही तालुक्यात भितीचे वातावरण पसरलं आहे.

दरम्यान परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर -ब्रह्मपुरी येथून वनविभाग व पोलिसांच्या विशेष कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच जोपर्यंत गावात धूमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात येत नाही, तोपर्यंत गयाबाईंचा मृतदेह न उचलण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *