जागावाटप ते कोणकोणते मतदारसंघ; एकनाथ शिंदे-अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना एक सूचना दिली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेनंतर आता भाजपसह महायुतीकडून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. येत्या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना एक सूचना दिली आहे.
अमित शाह हे काल मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्याला मुंबईतील आमदार, खासदारही उपस्थित होते. या मेळाव्यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या.
एकनाथ शिंदेंची विनंती काय?
लोकसभा निवडणुकीत जागावाटपासाठी उशीर झाला होता. मात्र आता तितका उशीर करायला नको. लवकरात लवकर शक्य तितक्या जास्त जागांवरील उमेदवार घोषित करु आणि प्रचाराला सुरुवात करु, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे केली.
राज्यात महायुतीचंच सरकार परत आणू, अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना दिली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी त्यांना राज्यातील कोणकोणत्या जागा हव्या आहेत, याचीही माहिती दिली. आता यावर अमित शाह हे विचार करतील आणि त्यानंतर महायुतीकडून जागावाटपाची घोषणा केली जाईल.
अमित शाहांकडून कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना
“६ लोकसभा अशा आहेत जिथे ६ विधानसभांमध्ये आपल्याला बहुमत होते. पण १ ठिकाणी ते बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ ६ विधानसभा आपण जिंकू तर एकच ते जिंकतील. याचा अर्थ समजतोय ना?”, असा सवाल अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केला. महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल, असा कानमंत्र अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.