“एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार होते, भाजपच्या ‘त्या’ नेत्याकडे संपूर्ण यादी”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाणार होते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाणार होते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आम्ही हिंमत केली नसती तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी शिवसेना विकली असती, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“अर्धे लोक जेलमध्ये जाणार”
“एकनाथ शिंदे आणि हे सर्वजण ईडी, सीबीआयला घाबरुन पळून गेले आहेत. यातील अर्धे लोक जेलमध्ये जाणार होते. या सर्वांची यादी भाजप नेते किरीट सोमय्यांकडे आहे. त्यात एकनाथ शिंदेंसह अनेकांची नावे आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. राजकारणात एकनाथ शिंदे यांनी कोणती हिंमत दाखवली हे त्यांनी सांगावे. त्यांनी जे काही केले, ते सर्व पैशाच्या जोरावर केले आहे. सर्व काही मॅनेज केले आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.
“कोणताही मोठा पुरावा असू शकतो का?”
“कुणाच्या अंगात आलं होतं, हे अजितदादांनी एकदा तपासावं. अडीच वर्षे आम्ही चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. पण गौतम अदानी यांना महाविकास आघाडीचं सरकार नको होतं. ही मुंबई, महाराष्ट्र अदानी यांना गिळायचा आहे. विकत घ्यायचा आहे. ओरबडायचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी अगोदर शिवसेना तोडली. त्यासाठी अदानींचा वापर केला हे या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा सांगत आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी तोडण्यामागे गौतम अदानी हे होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे अदानी होते, हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणताही मोठा पुरावा असू शकतो का?” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.