महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : भिवंडीतील ‘या’ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, JCB मधून उधळला गुलाल

विशेष म्हणजे JCB वरून गुलाल उधळत विजयी उमेदवारांनी आनंद साजरा केलाय.

  • संजय भोईर, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 22:57 PM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : भिवंडीतील 'या' ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, JCB मधून उधळला गुलाल

ठाणेः भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. खारबाव ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासून चुरशीची ठरलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा पदाधिकारी महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या उमेदवारांसमोर शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस आणि आरपीआय पक्षाच्या उमेदवारांचे मोठे आव्हान होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 13 सदस्य विजयी झाल्याने खारबाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलाय. त्यानंतर महेंद्र पाटील आणि त्यांचे सर्व उमेदवार खारबाव गावात आल्यानंतर या सर्व विजयी उमेदवारांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे JCB वरून गुलाल उधळत विजयी उमेदवारांनी आनंद साजरा केलाय. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : NCP One-Sided Rule Over Gram Panchayat In Bhiwandi)

भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचा वरचष्मा राहिला असून, तालुक्यातील तब्बल 28 ग्रामपंचायतीं वर शिवसेनेने वर्चस्व मिळविले असल्याचा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केलाय, तसेच 30 ग्रामपंचायतींवर भाजपचा वरचष्मा असल्याचा दावा खासदार कपिल पाटील यांनी केलाय.
भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींमधील 573 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध तर तब्बल 30 प्रभागातील 105 सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर 466 सदस्य पदासाठी 1082 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात लढत देत होते. त्यांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून तालुक्यातील निकालात शिवसेना आणि भाजपा पुरस्कृत सदस्यांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेचा दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला आहे. काल्हेर या बहुचर्चित ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व 17 सदस्य निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. तर खासदार कपिल पाटील यांच्या दिवे अंजुर गावात त्यांना सत्ता राखण्यात यश आले. परंतु शेतकरी संघटनेने त्यांना कडवी लढत देत तीन सदस्य निवडून आणले आहेत. तर पडघा ग्रामपंचायत निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना शिवसेनेने यश मिळविले तर मनसेने पडघा येथे यश मिळविले.
भिवंडी तालुक्यात भाजपाचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग असून त्यादृष्टीने या निवडणुका दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पडघा, पिसे, खांबाळा, केवणी, कोशिंबे, कांदळी, गुंदवली, दापोडा, वारेट, कुरुंद, कुकसे, लोनाड, बापगाव, भादाणे, वेहळे, डोहाळे, लामज, खांडपे, चावे या 20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने यश मिळविले असून, भारतीय जनता पार्टीने काल्हेर, शेलार, दिवे अंजूर, लाप, पिंपळनेर, सोनाळे, अंजुर, नांदकर, मानकोली, ओवळी, जुनांदूरखी, अंजुर, पिंपळास, भिनार, भरोडी, पुंडास या ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केलीय.

खारबाव येथील महेंद्र पाटील यांची एकहाती सत्ता प्रस्थापित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खारबाव येथील महेंद्र पाटील यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित करीत भाजपा, सेना, मनसे पुरस्कृत उमेदवारांचा पराभव केलाय. याशिवाय मालोडी, निंबवली या गावांत सत्ता मिळविली तर काँग्रेस पक्षाचे दयानंद चोरघे यांनी सरवली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली. तसेच 10 ग्रामपंचायतींवर स्थानिक ग्रामविकास समितीच्या माध्यमातून यश मिळविले असून, सरपंच निवडीनंतर या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाची सत्ता आहे हे स्पष्ट होणार आहे.

भिवंडी शहरातील भादवड येथील स्व. संपदा नाईक सभागृहात सकाळी तहसीलदार अधिक पाटील यांच्या उपस्थितीत 25 टेबलांवर मतमोजणीस सुरुवात झाली. तर हा निकाल ऐकण्यासाठी या परिसरात उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाच विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे जल्लोष अथवा मिरवणूक न काढता घरी जावे यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी नोटिसा बजावीत होते. दरम्यान बहुसंख्य ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक आघाडी करून लढविल्या गेल्या असल्याने सरपंच निवडीनंतर सत्ता कोणत्या पक्षाची हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : बडनेरा मतदारसंघात 90% ग्रामपंचायतींवर युवा स्वाभिमानचा झेंडा; नवनीत राणा म्हणतात…

Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : NCP One-Sided Rule Over Gram Panchayat In Bhiwandi