महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ

महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ ठरल्याचे चित्र असून, भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:05 AM, 19 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ
जळगाव : जिल्ह्यातील 789 पैकी 93 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर 15 जानेवारीला 687 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आज (सोमवारी) या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. हे निकाल समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वर्चस्वाचे दावे केले आहेत. दरम्यान यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ ठरल्याचे चित्र असून, भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे. काही तालुक्यात मात्र, भाजपने आपले वर्चस्व राखले. (maharashtra gram panchayat election result 202 BJP Fades In Front Of The Strength Of Mahavikas Aghadi In Jalgaon)

जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवे चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी दिग्गजांचे पॅनल पराभूत झाले. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखल्याचे दावे केले आहेत.

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग

जामनेरमध्ये भाजपच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खातं उघडलंय. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वाकोदमध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं आहे. तर एकूण अकरा जागा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी, जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचे द्वंद्व रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगला सामना

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ आहे. तर भाजप विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडत आहे. राज्यस्तरावरील याच राजकीय मोर्चेबांधणीचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रुपाने ग्रामीण भागात पाहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष म्हणून नाही तर गावकी-भावकीच्या माध्यमातून लढली जाते. असे असले तरी जळगावात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत एकमेकांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना प्रत्येक ठिकाणी रंगल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या