हे स्वत:च लटकते आणि भटकते आत्मे आहेत – संजय राऊतांचा कुणावर निशाणा?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाच्या वादावरून महायुतीतील नेत्यांवर तीव्र टीका केली आहे. शिंदे गटातील काही नेत्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषावर राऊत यांनी भाष्य केले. त्यांनी महायुतीतील नेत्यांना अस्थिर आत्मे असल्याचे संबोधित केले आणि त्यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राच्या प्रतिमेचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत, हे लोक या महाराष्ट्राचा कारभार बघणार का ? आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वत:ही फुटलेत. हे अस्वस्थ आत्मे आहेत. पवार साहेबांना भटकता आत्मा यांनी म्हटलं पण हे स्वत:च लटकते आणि भटकते आत्मा आहेत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील नेते उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.
पालकमंत्रीपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये नाराजीचं राजकारण सुरू आहे. शिंदे गटातील काही नेत्यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असून त्यामुळेच ते दरे गावी गेल्याचे बोलले जात होते. त्या मुद्यावरून संजय राऊत यांनी शिंदे आणि एकूणच महायुतीमधील नेत्यावंर टीकास्त्र सोडलं. कुठेतरी समाधाना माना, ज्या ईव्हीएमने तुम्हाला एवढा मोठा विजय दिला, त्याचं समाधान माना, महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
उदय सामतांवर साधला निशाणा
ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार हे एकनाथ शिंदेंना भेटले असा दावा उदय सामंत यांनी केला होता. त्यावरूनच राऊतांनी टीकास्त्र सोडलं. दावोसमध्ये बसून तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा करत आहात, लाज कशी वाटत नाही तुम्हाला ? मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमच्या आमदार-खासदारांची भूमिका असल्याचे सांगत संजय राऊतांनी महायुतीतील नेते उदय सामंत नेत्यांवर हल्ला बोल चढवला. ज्यांना जायचं ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत, पण आम्ही कशाला जाऊ ? आम्हाला या मराठी मातीचा स्वाभिनमान आहे, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलंय त्याचा आम्हाला अभिमान आहे.
उदय सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दावोसमधून महाराष्ट्रात पाठवावे. तिकडे ते काय करत आहेत ? तिथे ते शिंद्यांचेच आमदार फोडायला गेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. उदय सामंत हे भटकती आणि लटकती आत्मा आहेत, मुख्यमंत्री यांनी उद्योगमंत्री यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे. तुम्ही स्वत: फुटलात, बेईमान झालात ना, तुमच्या कपाळावर बेईमानीची पट्टी लागली आहे असा घणाघातही राऊत यांनी केला. आता फक्त त्यांनी एवढंच सांगणं बाकी आहे की संजय राूत, आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंना भेटलेत, सगळेच फुटणार आहेत, हे पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटले होते, पण हे स्वत:च भचकती आणि लटकती आत्मा आहेत , अशा शब्दांत राऊतांनी सामंतांवर घणाघात केला.