महाराष्ट्राला वॅक्सिनची दैनंदिन गरज 8 लाख, मिळतायत 25 हजार, टोपेंची लस तुटवड्यावर माहिती

महाराष्ट्राला 8 लाख दैनंदिन वॅक्सिनची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळत आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीय. Health Minister Rajesh Tope

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:06 PM, 4 May 2021
महाराष्ट्राला वॅक्सिनची दैनंदिन गरज 8 लाख, मिळतायत 25 हजार, टोपेंची लस तुटवड्यावर माहिती
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबईः देशात लसीकरणाचा उत्सव केला जात असला तरी राज्यातील अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा असल्याचं चित्र समोर आलंय. अनेकांना रांगेत तासनतास उभे राहूनही लस मिळत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राला 8 लाख दैनंदिन वॅक्सिनची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीय. (Maharashtra needs 8 lakh vaccines daily, gets 25 thousand says Health Minister Rajesh Tope)

राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा देशाचा रिकव्हरी रेट जास्त

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यात 84.7 टक्के रिकव्हरी रेट आहे. तसेच राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा देशाचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 27 वरून 22 टक्क्यांवर आलाय. ऑक्सिजन महत्त्वाचा विषय आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लीकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण 150 पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिलीय. तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अधोरेखित केलंय.

 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय, मात्र त्याचवेळी दुसरीकडे 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. राज्यात रुग्णसंख्या हळूहळू घटत आहे. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलंय. राज्यात रेमडेसिव्हीर साडेतीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील. सध्या आपण 40 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला 20 हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील.

1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिली

लस हा एक महत्त्वाचा विषय आहे. 45 वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त 30 हजार व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात 9 लाख डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ते द्यायचे आहेत. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरीत केले जातील. 1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. हे सर्व नागरिक 45 वर्षांपेक्षा जास्त आहेत.

देशात चार-पाच राज्यांमध्ये 1 मे रोजी लसीकरण सुरू

देशात चार-पाच राज्यांमध्ये 1 मे रोजी लसीकरण सुरू केलं. त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. लसीकरणाच्या मोहिमेला आम्ही प्राधान्य दिलंय. एक मेच्या आधी फक्त 3 लाख लसी मिळाल्या. या सर्व लसी घेऊन आम्ही 1 तारखेलाच लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. 18 ते 44 वयातील लोकांना आपण आतापर्यंत 1 लाख लोकांना लस दिलेली आहे. कोव्हिशील्ड लसीला 13 लाख 80 हजार डोसेसची पर्चेस ऑर्डर दिलेली आहे. तर कोव्हॅक्सिन लसीसाठी 4 लाख 79 डोसेसची पर्चेस ऑर्डर दिलेली आहे. असे साधारण मिळून 18 ते साडे अठरा लसींची ऑर्डर दिलेली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीय.

रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणावर गर्दी करू नये

माझी महाराष्ट्रातील तरुणाईला विनंती आहे की, रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणावर गर्दी करू नये. मी एक खात्रीपूर्वक सांगतो की, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री तसेच सर्व मंत्र्यांचं मत हे एका चेकमध्ये लसी खरेदी करूयात असे आहे. मात्र, सध्या लसी उपलब्ध होत नाहीयेत. सध्या स्पुटनिक लससुद्धा आलेली आहे. त्याविषयी दर ठरवणे बाकी आहे. त्यानंतर ही लससुद्धा मिळेल. पुण्याचे अदर पूनावाला यांच्याशीसुद्धा चर्चा सुरू आहे. ते विदेशातून परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. ग्लोबल टेंडरमधून अनेक देशांनी प्रतिसाद दिला आहे. ज्या देशांकडून आपल्याला ऑक्सिजन लवकर मिळेल, त्यांच्याकडून तो लवकर खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लिक्विड ऑक्सिजनसाठीसुद्धा काही ऑफर्स आल्या आहेत. त्याविषयी जसे निर्णय होतील ते कळवत राहू, असंही ते म्हणालेत.

संबंधित बातम्या

Coronavirus News Updates: देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर

Maharashtra needs 8 lakh vaccines daily, gets 25 thousand says Health Minister Rajesh Tope