TV9 मराठीचे विविध प्रतिनिधी, मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामानामध्ये (Weather Update) सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याची थंडी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. तर मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातही कधी हुडहुडी तर कधी ढगाळ वातावरण असं चित्र निर्माण झालंय. मुंबईतील (Mumbai Rain) दादर, लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानातील गारवा वाढला आहे. तर सिंधुदुर्ग (Sindhudurg Weather) जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुणे जिल्ह्यातीली मावळमध्ये तर पारा आणखी घसरला असून जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतायत.
मागील काही दिवसांपासून राज्यात कुठे गारवा तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरी असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर, महालक्ष्मी, लोअर परेल या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. मुंबईत सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. यापूर्वी काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. मात्र आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत पुनेहा गारवा निर्माण झाला. येत्या काही दिवसात मुंबईतील किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
मुंबईत आज संध्याकाळी अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली.
राज्यात येत्या २ दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी #पाऊस पडण्याची शकल्क्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाडा तसाच विदर्भात हवामान कोरड राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 22, 2022
या गुलाबी थंडीचा सध्या मुंबईकर आनंद लूटत आहेत. तर दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात हुडहुडी कायम असून मावळ सारख्या ठिकाणी पुन्हा एकदा जागोजागी शेकोट्या पेटू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदा चांगलाच गारठा पडला आहे. त्यामुळे पारा घसरतोय. या गुलाबी थंडीत रस्त्यावर, गल्ली बोळात शेकोट्या पेटत आहे.
इतर बातम्या :