बुलडाण्यात पतसंस्थेकडून गरीबांनी पै-पै करुन जमवलेल्या कोट्यवधींवर डल्ला

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक, रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक या 4 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व आरोपी फरार आहेत.

बुलडाण्यात पतसंस्थेकडून गरीबांनी पै-पै करुन जमवलेल्या कोट्यवधींवर डल्ला

बुलडाणा : गरीब कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई पतसंस्थेत जमा केली. पण या पतसंस्थेने या गरीब कुटुंबांवर आज न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ आणली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक, रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक या 4 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व आरोपी फरार आहेत. हा घोटाळा दीड कोटींचा नसून अजूनही चौकशीदरम्यान या घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र ठेवीदारांचे पैसे अद्यापही मिळत नसल्याने ठेवीदार चिंतेत सापडलेत.

राजकीय वजन वापरुन पतसंस्था सुरुच ठेवली

चिखली येथील राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी 12 वर्षांपूर्वी 11 संचालकांना सोबत घेऊन चिखली शहरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली. मात्र पतसंस्था सुरु झाल्यापासूनच ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आणि तेव्हापासून ठेवीदारांचे पैसे असुरक्षितच राहिले. मात्र राजकीय वजन असल्याने आणि संचालक मडंळीही राजकारणाशी निगडित असल्याने पतसंस्था चालूच ठेवली. या पतसंस्थेला 12 वर्षांचा कालावधी उलटलाय. मागील दोन वर्षांपासून पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणखीच बिघडली. चिखली तालुक्यातील अनेक लोकांच्या 6 कोटींच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपूनही मिळनासे झाले.

गरीब कुटुंब रस्त्यावर

ठेवीदार बँकेत चकरा मारून थकले. अध्यक्षांच्या घरी सुद्धा जाऊन आले. शिवाय सहाय्यक  निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडेही चकरा मारल्या, पण पैसा काही मिळाला नाही. ठेवीदारांना फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात. यात कोणाचे 10 लाख, कोणाचे 18 लाख, तर कुणाचे 24 लाख अडकून आहेत. गरीब कुटुंबांना पै-पै जमवून मुलींची लग्न, शिक्षण यासाठी पैसा जमवला होता. यामध्ये पैसा गुंतवलेले वृद्धही चिंतेत आहेत.

पतसंस्थेत अनेक संशयास्पद व्यवहार

पतसंस्थेत पै-पै जमा करून ठेवलेले पैसे मिळत नसल्याने शेवटी ठेवीदारांनी जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडे तक्रारी केली. त्यानुसार सहकार विभागाने या पतसंस्थेचे मागील दोन वर्षाचे ऑडिट केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. बँकेने कर्ज वाटप करताना कोणतेही तारण घेतलेले नाही. अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे काढल्याचं आढळून आलंय. कर्मचाऱ्यांनीही पैसे परस्पर काढल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय खर्चही अवास्तव करण्यात आलाय. असा जवळपास मागील दोन वर्षात 1 कोटी 47 लाख 20 हजार 329 रुपयांचा अपहार केल्याचं निष्पन्न झालंय.

अनेक लोकांचे पैसे या बँकेत अडकले असून काही ठेवीदार अद्यापही समोर आलेले नाहीत. या बँकेचे संपूर्ण ठेवीदार समोर आल्यास हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑडिटमध्ये या सर्व बाबी समोर आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर बँकेचे अध्यक्ष दत्ता खरात, मुख्य शाखा व्यवस्थापक सतीश वाघ, रोखपाल परमेश्वर पवार आणि शाखा व्यवस्थापक गणेश खंडागळे यांच्यावर दीड कोटींचा अपहार केला म्हणून भा.दं. वि कलम 420, 409, 406, 468, 470, 471, 477-अ, 34 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 नुसार कलम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या फरार आरोपींचा शोध आता घ्यावा लागणार आहे.

पतसंस्थेत पैसे अडकल्याने अनेक ठेवीदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अध्यक्षांसहित तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले खरे, मात्र बँकेत इतरही संचालक मडंळी असून ते सुद्धा या अफरातफरीला तितकेच जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी आणि त्यांच्याजवळील संपत्ती जप्त करून लोकांचे पैसे परत द्यावे अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

कोण आहेत बँकेचे अध्यक्ष

दत्ता खरात – यांनी 35,28,484 एवढ्या रकमेचा वैयक्तिक फायदा केला असून ते राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक आहेत. ते समता परिषदेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी खरात यांनी रासपमध्ये प्रवेश केला होता आणि राज्याचे प्रदेशउपाध्यक्षपदही मिळविलं. खरात हे राष्ट्रवादीकडून चिखली नगरपालिकेचे नगरसेवकही होते. इतर पक्षातील नेत्यांसोबतही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

मुख्य शाखा व्यवस्थापक सतीश वाघ – यांनी 46,70,055 , रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार यांनी 52,38,536 आणि राऊतवाडी, शाखा व्यवस्थापक गणेश खंडागळे 12,83,254 अशी एकूण 1,47,20,329 रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *