आमच्या मुलीचं लग्न मोडलंय, येऊ नका; पाटी लावून मुलीच्या वडिलांनी माफी मागितली

  • रईस शेख, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 11:02 AM, 17 Apr 2019
आमच्या मुलीचं लग्न मोडलंय, येऊ नका; पाटी लावून मुलीच्या वडिलांनी माफी मागितली

नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव येथे मुलीच्या वडिलांनी लग्नाच्या दिवशीच लग्नस्थळी पाटी लावून माहिती दिल्याची घटना घडली. मुलीचे लग्न मोडल्याचे सांगतानाच वडिलांनी निमंत्रित पाहुण्यांना लग्नाला न येण्यास सांगितले. तसेच यासाठी पाहुण्यांची माफीही मागितली.

या पाटीवर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी आपल्याकडे हुंडा मागितला आणि आपला अपमानही केल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी या पाटीवर लिहिले,

‘आज माझ्या मुलीचं लग्न होतं. मी तुम्हाला त्याचे निमंत्रण दिले होते, पण मुलाच्या घरच्यांनी हुंडा मागितला. तसेच त्यांनी माझा अपमानही केला. त्यामुळे आम्ही लग्न मोडलं आहे. मी तुमच्या सर्वांची माफी मागतो’,

बोर्डवरील हा सर्व मजकूर उर्दू भाषेत लिहिलेला आहे.

अनेकजण आता कोठे हुंडा घेतला जातो? असा प्रश्न विचारत काळ बदलल्याचे सांगतात. मात्र, त्यांचे हे विधान किती खरे आणि किती खोटे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. हुंड्यासाठी ऐन लग्नाच्या दिवशी लग्न मोडण्याच्या या घटना समाज म्हणून नक्कीच डोळ्यात अंजण घालणाऱ्या आहेत. अशाच घटना आपल्या अवतीभवती अनेकदा घडत असतात. मात्र, समाज म्हणून आपण यातून बोध घेणार का? हाच प्रश्न पुन्हा एकदा या घटनेतून उपस्थित होतो.