साखर संघाच्या बैठकीत शरद पवारांनी हस्तक्षेप करावा आणि ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून द्यावा : सुरेश धस

साखर संघाच्या बैठकीत शरद पवार यांनी हस्तक्षेप करून ऊसतोड मजुरांना वाढीव दर मिळवून द्यावा असं साकडं आमदार सुरेश धस यांनी पवारांना घातले आहे.

साखर संघाच्या बैठकीत शरद पवारांनी हस्तक्षेप करावा आणि ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून द्यावा : सुरेश धस

बीड : भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार सुरेश धस यांनी पाठ फिरवली. ऊसतोड मजुरांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सुरेश धस यांनी त्यांच्या निवासस्थानावर ऊसतोड मजुरांचा मेळावा घेतला. येत्या 27 तारखेला साखर संघाच्या बैठकीत शरद पवार यांनी हस्तक्षेप करून ऊसतोड मजुरांना वाढीव दर मिळवून द्यावा, असं साकडं आमदार सुरेश धस यांनी पवारांना घातले आहे. (MLA Suresh Dhas on Sharad Pawar over Sugarcane Worker problem)

ऊसतोड मजूर मुकादमाने वाहतूकदारांना 150 टक्के वाढीव दर मिळावा यासाठी गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील विविध संघटनांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत वाढीव भाव मिळणार नाही तोपर्यंत कारखान्याचा बॉयलर पेटू देणार नाही असा पवित्रा ऊसतोड मजूर संघटनांनी घेतला होता. सध्या बऱ्याच कारखान्याचे बॉयलर पेटले आहेत. मात्र ऊसतोड मजूर संपामुळे पोहोचत नसल्यामुळे साखर संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी किमान भाववाढ मिळाली तरी ऊसतोड मजूर कामगारांनी कामावर जावं, असं आवाहन केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना चांगलेच फैलावर घेतले. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत एकही मजूर कारखान्यावर जाणार नाही आणि जाऊ देणार नाही, असा पवित्रा सुरेश धस यांनी घेतल्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी निर्माण झाली.

गोपीनाथ मुंडे असते तर ऊसतोड मजूर संघटनांना विचारल्याशिवाय कुठलेही निर्णय घेतले नसते, असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लगावला. त्यामुळे येणाऱ्या काळात ऊसतोड मजुरांचा प्रश्न चिघळणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दालनात आता ऊसतोड मजुरांचा प्रश्न गेला आहे. या नाजूक मुद्द्यावर शरद पवार यांनी हस्तक्षेप करून वाढीव दर मिळवून द्यावा यासाठी आमदार सुरेश धस यांनी आता साकडे घातले आहे. 27 तारखेला मांजरी येथे साखर संघाची बैठक आहे या बैठकीत शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊसतोड मजुरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

27 तारखेला जर निर्णय झालाच नाही तरी एकही मजूर कारखान्याला जाऊ देणार नाही असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात ऊसतोड मजुरांचा हा संप चिघळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

(MLA Suresh Dhas on Sharad Pawar over Sugarcane Worker problem)

संबंधित बातम्या

साखर संघाच्या बैठकीत शरद पवार असतील तरच चर्चा करु, अन्यथा…. : सुरेश धस

सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *