केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज 8 जून रोजी केरळात मान्सून दाखल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.

केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी

पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो असे सर्वांनाच झालं आहे. महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण चातकासारखी पावसाची वाट पाहताना दिसत होते. दरम्यान अखेर देवभूमी केरळात मान्सून दाखल झाला आहे. स्कायमेट या हवामान संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठिकाणी मान्सून सक्रीय होण्यासाठी ओ एल आर, वाऱ्याची अनुकूलता, पाऊस हे तीन घटक फार महत्त्वाचे असतात. दरम्यान काल 7 जूनला हे तीनही घटक सक्रीय झाल्यानंतर अखेर हवामान तज्ज्ञांनी केरळात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली.

गेल्या दोन दिवसांपासून लक्षद्वीप बेट, कर्नाटक, केरळ किनारपट्टीलगतच्या काही ठिकाणी पाऊस पडला. या दोन दिवसात या ठिकाणच्या 60 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रात 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतरच हवामान विभागाने मान्सून सक्रीय झाल्याचं म्हटलं आहे.

बुधवारी म्हणजेच 5 जूनला केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप बेटांवर काही ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. याबाबत स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप बेट या तीन ठिकाणच्या 60 टक्के क्षेत्रात सरासरी 2.5 मिमी पावसाची नोंद झाल्यानंतरच मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली जाते.

केरळातील पावसाची आकडेवारी

ठिकाण5 जून पावसाची सरासरी नोंद (मिलीमीटरमध्ये)6 जून पावसाची सरासरी नोंद (मिलीमीटरमध्ये)7 जून पावसाची सरासरी नोंद (मिलीमीटरमध्ये)
मिनिकॉय 3.81.811.6
अमिनी दिविNil33.0Trace
तिरुअनंतपुरम0.85.041.8
पुनालूरNil4.82.5
कोल्लम 8.01.015.0
अलाप्पुझा 2.15.841.2
कोट्टायम1.22.62.6
कोच्ची Nil50.442.6
थ्रिस्सूरNil0.87.0
कोझिकोड0.415.2Nil
थालास्सेरीNil3.6Nil
कन्नूर 0.18.33.1
कुडुलुNil2.4Nil
मॅंगलोरNil8.10.1

महाराष्ट्रात पावसाच्या सरी

मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळे 12 तारखेला राज्यात मान्सून बरसेल. मात्र वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. दरम्यान मान्सून दाखल होण्याआधी वर्धा, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.

मुंबईतही रिमझिम पाऊस

तसंच आज 8 जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कोसळल्या. दादर, वरळी, लोअर परेल, कांदिवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

बळीराजाला दिलासा

देशात यंदा 96 टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता होती. मात्र सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा 100 टक्के पाऊस बरसणार आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *