एक कॉलेज, एक वर्ग, आणि एक रुम… स्पर्धा परीक्षेत मिळाले घवघवीत यश, वाचा Success Story
कराडचे सुरज पडवळ मित्रांच्या साथीने MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ग-१ अधिकारी झाले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एकत्र आलेल्या या रूममेट्सनी एकमेकांना प्रोत्साहन देत यशाची शिखरे गाठली. या प्रेरणादायी प्रवासात मित्रांची साथ निर्णायक ठरली.

आयुष्यात मित्र हे जर मार्गदर्शक म्हणून सोबत मिळाले तर सामान्य माणूसही आभाळाला गवसणी घालू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कराडचे सुरज पडवळ आणि त्यांचे रूममेट मित्र. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एकत्र आलेले आणि एकाच खोलीत राहणारे मित्र यशाच्या शिखरावर पोहोचल्याची एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. कराडचे सुपुत्र सुरज पडवळ यांची महाराष्ट्र राज्य सेवेतून एसएसटी या क्लास-वन पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे सुरज यांना या यशापर्यंत पोहोचायला त्यांच्या रूममेट मित्रांची साथ आणि प्रेरणा निर्णायक ठरली.
संपूर्ण शिक्षण कराडमध्येच
सुरज पडवळ यांनी आपले संपूर्ण शिक्षण कराडमध्येच पूर्ण केले. सामान्य घरातील असूनही प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. यापूर्वी ते राज्य कर विभागात एसटीआय म्हणून कार्यरत होते. मात्र, मोठ्या ध्येयाच्या ओढीने त्यांनी तयारी सुरुच ठेवली. मी एसटीआय पद मिळाल्यावर थांबलो नाही. मनात आणखी मोठे ध्येय ठेवले. सातत्याने अभ्यास, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवला. आज क्लास-वन पदावर निवड झाल्याचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही, अशा भावना सूरज पडवळ यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या प्रेरणेमुळेच आज मी क्लास-वन पदावर पोहोचलो
सूरज यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या रूममेट्सना जाते. एकाच कॉलेजमध्ये, एकाच वर्गात शिकणाऱ्या आणि नंतर एकाच रूममध्ये तयारी करणाऱ्या या मित्रांनी एकमेकांना साथ दिली. प्रसाद चौगुले, राकेश गीते, अनिकेत साखरे, सुरज गाढवे, निलेश खाडे, संकेत देसाई या सर्वांनी मला सतत प्रोत्साहन दिले. तू आणखी मोठं करू शकतोस या विश्वासाने मला पुन्हा तयारीकडे वळवलं. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज मी क्लास-वन पदावर पोहोचलो.
विशेष म्हणजे, त्यांचे मित्र सुरज गाढवे आणि अनिकेत साखरे हे दोघेही एकाच दिवशी, एकाच विभागात अधिकारी म्हणून नोकरीला लागले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच सुरज पडवळ यांनी जीएसटी विभागात अधिकारी बनण्याची आणखी मोठी झेप घेतली.
मोठी पोस्ट मिळवण्याची तयारी
सध्या हे तिघेही अधिकारी पदावर असले तरी त्यांची मोठी पोस्ट मिळवण्याची तयारी अजूनही सुरूच आहे. तसेच, या मित्रांच्या रूममध्ये राहणारा त्यांचा चौथा मित्रही लवकरच यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सुरज यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले असून, आई गृहिणी आहेत. बहीणही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाने दिलेल्या मानसिक आधाराबद्दलही सुरज यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“मला प्रशासनात काम करताना जनतेपर्यंत सेवा सहजपणे पोहोचावी, नागरिकांना सुलभतेने मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे सूरज गाढवे यांनी प्रशासनात काम करतानाचा आपला उद्देश स्पष्ट केला.
