मुंबईत 2018 मध्ये 153 लोकांचा अपघाती मृत्यू, तर 599 जण जखमी

गेल्या काही वर्षात  मुंबईत अनेकदा झाड पडणे, दरड कोसळणं, घरांच्या भिंती कोसळणे, इमारत कोसळणे, आग, समुद्रात बुडून या किंवा यांसारख्या अपघाती घटनेत वाढ झाली आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव जातात.

मुंबईत 2018 मध्ये 153 लोकांचा अपघाती मृत्यू, तर 599 जण जखमी

मुंबई : सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल 10 हजार 068 आपत्कालीन दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व दुर्घटनांमध्ये 153 लोकांचा मृत्यू झाला असून, 599 जण जखमी झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई महापालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे.

शकील अहमद शेख यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला 2018 या वर्षांत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या याची माहिती विचारली होती. तसेच या दुर्घटनामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झालेत याचीही माहिती विचारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2018 पासून ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुंबईत 10 हजार 068 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यात तब्बल 153 जणांचा मृत्यू झाला. यात 116 पुरुष आणि 37 स्त्रियांचा समावेश आहे. तर या सर्व दुर्घटनेत 599 लोक जखमी झाले. जखमींमध्ये 383 पुरूष आणि 216 स्त्रियांचा समावेश होता. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहिती अधिकारी रश्मी लोखंडे यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षात  मुंबईत अनेकदा झाड पडणे, दरड कोसळणं, घरांच्या भिंती कोसळणे, इमारत कोसळणे, आग, समुद्रात बुडून या किंवा यांसारख्या अपघाती घटनेत वाढ झाली आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव जातात.

मुंबईत सर्वाधिक शॉटसर्किटच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत 2018 या वर्षात शॉर्टसर्किट आणि आग लागल्याच्या 3 हजार 930 घटना घडल्या. त्यात एकूण 46 लोकांचा मृत्यू झाला तर 338 लोकं जखमी झाले आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत झाडे पडण्याच्या एकूण 3169 घटना नोंद आहेत. या सर्व घटनांमध्ये एकूण 6 लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये पुरुषांचा समावेश जास्त आहे. झाड पडल्याने एकूण 30 जखमी झाले.

त्याशिवाय मुंबईत गॅस गळतीच्या 297 घटना घडल्यात. यात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र 15 जण जखमी झाले. तर दरड कोसळण्याच्या एकूण 71 घटना घडल्या आहेत. त्यातही 6 जणांचा मृत्यू झाला. तर 30 लोकं जखमी झाले. घरांचा भाग, इमारती कोसळल्याच्या घटना 27 नोंद आहेत.

तसंच मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर ऑईल पडल्याने 428 दुर्घटना घडल्या आहेत. त्याशिवाय समुद्र, नाला, नदी आणि विहिरीत बुडून मृत्यू होण्याचा प्रमाण वाढलं आहे. मुंबईत अशाप्रकारे अपघात झाल्याची 1 हजार 258 घटनांची नोंद आहे. त्यात 76 लोकांचा मृत्यू, तर 65 लोकं जखमी झाले.

या व्यतिरिक्त 534 इतर अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 8 पुरुषांचा आणि 2 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकूण 57 लोकं जखमी झाले आहेत.

आपत्कालीन घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याबाबत काही तरी विशेष व्यवस्था आखावी अशी मागणी  शकील अहमद शेख यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांना केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI