मुंबई महानगरपालिकेतील 3 नगरसेवकांचे पद रद्द

मुंबई महानगरपालिकेतील 3 नगरसेवकांचे पद रद्द


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 3 नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. यात भाजपच्या 2, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या नगरसेवकांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. जात पडताळणी समितीने एकूण 5 जणांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरवले होते. त्याविरोधात या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी 2 जणांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.

न्यायालयाने 3 नगरसवेकांची याचिका फेटाळल्याने आज पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काँग्रेसचे राजपती यादव, भाजपचे मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा केली.

संबंधित 3 नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारांची निवड होऊ शकते. तसे झाल्यास प्रभाग क्रमांक 28 मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 76 मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे (काँग्रेस), प्रभाग क्रमांक – 81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना संधी मिळू शकते.

काय आहे प्रकरण?

प्रभाग क्रमांक 28 मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक 76 मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक 81 मधील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक 67 च्या भाजप नगरसेविका सुधा सिंग आणि प्रभाग क्रमांक 90 मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने खोटे ठरवले होते. त्याविरोधात या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी 2 जणांना दिलासा देताना न्यायालयाने इतर 3 जणांची याचिका फेटाळून लावली.

पाहा व्हिडीओ:

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI