पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या; उद्धव ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:30 PM, 19 Jan 2021
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या; उद्धव ठाकरेंच्या महापालिकेला सूचना
उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची संख्या वाढविणे, फूड हब तयार करणे, बस थांब्यांचे नूतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. (Deepening And Widening Of Nallas In Mumbai Before Monsoon Says Uddhav Thackeray)

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.

90 टक्के मार्गांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार

मुंबईतील पादचारी मार्गांचे वॉडनिहाय सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यासाठी 24 वॉर्डमधील 149 पादचारी मार्गांची निवड करण्यात आली आहे. यातील 90 टक्के मार्गांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या मार्गांचे कशाप्रकारे सौंदर्यीकरण केले जात आहे याचे सादरीकरण आयुक्त चहल यांनी केले.

प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढविण्यात येणार

मुंबईत सुमारे 344 उड्डाणपूल असून त्यापैकी सौंदर्यीकरणासाठी 42 पुलांची निवड करण्यात आली आहे, तर प्रत्येक वॉर्डातील पाच याप्रमाणे 120 वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वरळी सी फेस येथे बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नल अन्यत्र देखील लावावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईत स्ट्रीट फूड हब करण्यात येत असून त्यासाठी 62 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढविण्यात येणार असून, नव्याने 22 हजार 774 शौचकुप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी 20 हजार 301 शौचकुपांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 8637 नवीन प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत.

291 ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार

महानगरातील 386 ठिकाणी पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. त्यातील 171 ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून 120 ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण 291 ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

कार आणि सरकार दोन्ही चालवतोय; स्टेअरिंगवरची पकड घट्ट आहे : उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Deepening And Widening Of Nallas In Mumbai Before Monsoon Says Uddhav Thackeray