अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलीस उपमहानिरीक्षकांवर गुन्हा

पोलिसांकडे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी असते. असं असतानाही तळोजा येथे पोलीस उपमहानिरिक्षकांवरच (डीआयजी) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाला आहे (Molestation of Minor by Police Officer).

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 22:44 PM, 26 Dec 2019
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलीस उपमहानिरीक्षकांवर गुन्हा
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : पोलिसांकडे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी असते. असं असतानाही तळोजा येथे पोलीस उपमहानिरिक्षकांवरच (डीआयजी) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाला आहे (Molestation of Minor by Police Officer). या प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी पीडित मुलीच्या पालकांना तब्बल 6 महिने संघर्ष करावा लागला (Molestation of Minor by Police Officer).

पीडित मुलीच्या वडिलांनी 5 जून 2019 रोजी खारघरमध्ये आपल्या अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी पुण्याचे आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांनाही बोलावलं. वाढदिवस साजरा करताना मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या शरीरावरील केक जीभेने चाटत विनयभंग केला. आरोपी मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओही तयार केला. त्यांनी हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवत आरोपी मोरेंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली. विशेष म्हणजे ही घटना होऊन 5 महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल घेतली न घेता गुन्हा देखील दाखल केला नाही. 21 डिसेंबर 2019 रोजी पीडित मुलगी खारघर येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये वही खरेदीसाठी गेली होती. आरोपी मोरे यांनी तेथेही पीडितेचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपी मोरे पाठलाग करत असल्याचं लक्षात येताच मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी घटनास्थळी येउन आरोपीचा चालक आणि अन्य एक कर्मचारी यांना थेट खारघर पोलीस ठाण्यात आणले.

खारघरमधील शॉपिंग सेंटरमध्ये मुली ट्युशनसाठी जातात. याच ठिकाणी डीआयजी मोरे माझ्या मुलीचं अपहरण करण्यासाठी पोलीस गाडीमध्ये आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला. यानंतर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त संजय कुमार यांना माहिती दिली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर आज (26 डिसेंबर) तळोजा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस अधिकारी मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोरे सध्या फरार आहेत.