हार्बर लोकल सेवा पुन्हा एकदा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत राहावं लागत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:37 PM, 18 Feb 2021
हार्बर लोकल सेवा पुन्हा एकदा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा
harbour local

नवी मुंबईः मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी हार्बर लोकल सेवा पुन्हा एकदा ठप्प झालीय. मानसरोवर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत राहावं लागत आहे. (Harbor local service once again stalled; Detention of passengers)

उरणकडे जाणाऱ्या ट्रेन सोडा नाहीतर आम्ही हटणार नाही, प्रवासी मागणीवर ठाम

आता नेरुळ स्टेशनमध्ये 100 ते 150 प्रवाशांनी ट्रेन थांबवल्याची माहिती मिळत आहे. उरणकडे जाणाऱ्या ट्रेन सोडा नाही, तर आम्ही हटणार नाही, अशा मागणीवर ते अडून बसले आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झालाय. घटनास्थळी जीआरपी आणि नेरुळ पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मानसरोवर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं नेरूळवरून बामण डोंगरीकडे आणि खारकोपरमार्गे उरणकडे जाणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे घरी परतत असतानाच प्रचंड हाल झालेत. खारकोपरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी नेरूळ-बामण डोंगरीमार्गे उरण गाडी सोडण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरच ठिय्या दिला होता.

नेरूळ-बामण डोंगरीमार्गे उरण गाडी न सोडल्यास आम्ही पण पनवेल गाडी सोडणार नाही, असंही त्या प्रवाशांनी ठणकावलं. त्यामुळे हार्बर मार्गावरच्या लोकल सेवेचा पुरता खोळंबा झाला. तासाभरापासून हार्बर रेल्वेचा खोळंबा झालेला असून, आता हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे. सीएसटीकडून पनवेलकडे येणाऱ्या सगळ्याच ट्रेनचा खोळंबा झाला होता.नेरूळ रेल्वे स्थानकात आज रात्री दहा वाजता नागरिकांकडून ही ट्रेन अडवण्यात आली. सीएसटीकडून पनवेल येथे जाणाऱ्या ट्रेन समोर शंभर ते दीडशे नागरिकांनी धरणे धरल्याने या ट्रेनला 25 ते 30 मिनिटे नेरूळ रेल्वे स्थानकात थांबावे लागले. त्यामुळे मानखुर्दपर्यंत रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मात्र काही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

उलवे परिसरातील खार कोपर आणि बामण डोंगरी येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सहा पर्यंतच चालवल्या जातात. त्यामुळे मुंबई येथून कामावरून येणाऱ्या लोकांना रिक्षाच्या साह्याने प्रवास करावा लागतो. तर नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत शंभर ते दीडशे रुपये रिक्षाचालक भाडे आकारत होते. त्यामुळे दररोज न सोसणाऱ्या आर्थिक खर्चाने नागरिक त्रासले होते. शेवटी सहनशीलतेचा अंत संपल्याने नेरूळ रेल्वे स्थानकात ट्रेन अडवून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. शेवटी पोलिसांच्या मदतीने उलवे करीता ट्रेन सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केल्यावर नागरिक शांत झाले आणि रेल्वे सुरळीत सुरू झाल्या.

संबंधित बातम्या

Special Report | मुंबई लोकल पुन्हा बंद होणार का?