“चित्ररथ नाकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान, यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे (Jitendra Awhad on rejection of Maharashtra Chitrarath).

  • शशिकांत कासार, टीव्ही9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:47 PM, 2 Jan 2020
"चित्ररथ नाकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान, यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला"

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे (Jitendra Awhad on rejection of Maharashtra Chitrarath). केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारुन महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला आहे. यातून केंद्रातील माणसांच्या मनाचा कोतेपणाचा दिसल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्रातील माणसं खोट्या मनोवृत्तीची आहेत. राज्यात त्यांची सत्ता नाही, विरोधकांची सत्ता आहे म्हणून त्यांनी चित्ररथ नाकारला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आम्ही 26 जानेवारीला जेव्हा चित्ररथ नेतो, तेव्हा त्यातून महाराष्ट्राची विचारधारा नेत असतो. तुम्ही महाराष्ट्राची विचारधारा अडवू शकत नाही. तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्राचे विचार कधीही अडवता येणार नाही.”

लहान मुलं क्रिकेट खेळताना ज्याची बॅट आहे तो आऊट झाल्यावर मला खेळायचं नाही असं म्हणत बॅट घरी घेऊन घरी जातो. मोदी देखील तसंच करायला लागले आहेत, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले, “देशाला इतक्या लहान मनोवृत्तीचे पंतप्रधान मिळाले. त्यांनी राज्यातील सत्ता गेली तर इतकं मनाला लावून घेतलं की महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.” यावेळी त्यांनी भाजपला लोकांनी नाकारल्याचाही मुद्दा मांडला.

“मराठी माणूस हा अपमान सहन करणार नाही”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक बलिदान देणारे समाजसुधारक आणि क्रांतिकारक महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने निर्माण केले. 1857 च्या संग्रामाची पेरणी मुळात बंगालमध्येच झाली. या लढ्यात महाराष्ट्रातील माणसं सर्वात जास्त लढले. महाराष्ट्राचा आणि बंगालचा असा अपमान होत असेल तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे. मराठी माणूस हा अपमान सहन करणार नाही.”

यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? : संजय राऊत

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, ” महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. त्याला अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे? हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपने बोंबाबोंब केली असती. मग ते आज गप्प का?”