माईक काढल्याने गोंधळ, प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई, फडणवीस म्हणतात, ही तर आणीबाणी

आघाडी सरकारने 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. (mlas parallel assembly)

माईक काढल्याने गोंधळ, प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई, फडणवीस म्हणतात, ही तर आणीबाणी
devendra fadnavis

मुंबई: आघाडी सरकारने 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला. (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला.

विधानसभेत पडसाद

फडणवीस यांच्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोयल आणि हरिभाऊ बागडे यांनी या अभिरुप विधानसभेच्या चर्चेत भाग घेतला. ही चर्चा सुरू असतानाच तिकडे विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला? माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.

मार्शल येताच गोंधळ वाढला

अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमदारांना माईक देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश आहे. त्यामुळे आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं मार्शल भाजपच्या आमदारांना सांगत होते. मात्र, भाजपचे आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. त्याचवेळी मार्शल माईक काढून घेत असताना मीडियाचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. मीडियालाही दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला.

सरकारच्या विरोधात बोलतच राहणार

या संपूर्ण प्रकारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

इंदिरा गांधीही आवाज दाबू शकल्या नाहीत

या सरकारला आमचा डीएनए माहीत नाही. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत, असं सांगतानाच आम्हाला विधानसभेच्या पायरीवर बसू दिले जात नसेल तर आम्ही प्रेस रुममध्ये जाऊन प्रतिविधानसभा भरवू असा इशारा फडणवीसांनी दिला. त्यानंतर विरोधी पक्षाने विधानसभेच्याच पायरीवर माईकशिवाय प्रतिविधानसभा भरवण्यात आली. (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: विरोधकांची विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा, सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला

भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले

Monsoon Session Live Updates | महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय – देवेंद्र फडणवीस

(maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI