राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:59 AM, 9 Apr 2019
राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही मनसेविरोधात पोस्ट टाकणाऱ्या अनेकांना अशाप्रकारे मारहाण करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्याचे मनसेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवाजी पार्क येथे जमावे असे लोकांना मनसेच्या फेसबुक पेजवर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

मात्र मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याचे राहते घर शोधले. त्यांच्या घरात जाऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच  त्यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत त्यांना जबरदस्ती करत माफी मागायला लावली. तसेच त्यांना उठा-बशाही काढायला लावल्या. यावर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मनसे कार्यकर्त्यांना विरोध केला. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.

सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल  होत आहे. या व्हिडीओत ती व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि मनसेचे कार्यकर्ते दिसत आहे. त्या व्यक्तीने लिहिलेल्या पोस्टबाबत मनसे कार्यकर्त्यांनी विचारणा केली. याबाबत त्यांनी यावर स्पष्टीकरण देत असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे सध्या घाटकोपर परिसरात भितीचे वातावरण पसरलं आहे.