मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:47 AM, 5 May 2019
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज (5 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द अप-डाऊन अशा दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक नाही.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर आज कल्याण ते ठाणे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 10.54 ते दुपारी 3.52 पर्यंत असेल. कल्याणवरुन सुटणाऱ्या सर्व अप जलद लोकल या अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या सर्व जलद लोकल ब्लॉक दरम्यान मुलूंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकावर निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या सर्व जलद लोकल सकाळी 10.16 ते दुपारी 3.22 दरम्यान घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. या दरम्यान सर्व लोकल 15 मिनिटे उशिरा पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व धिम्या लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान 15 मिनिटे उशिराने धावतील. यासोबतच मेल-एक्स्प्रेस गाड्याही 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान वडाळा ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.34 ते 3.44 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या सर्व लोकल रद्द केल्या आहेत. तसेच पनवेल, बेलापूर, वाशीवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व लोकलही सकाळी 10.21 ते 3.47 दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल ट्रेन चालवली जाईल.