VIDEO : मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी मनसेने (MNS Morcha teaser) वातावरण निर्मिती सुरु केली आहे.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:46 PM, 5 Feb 2020
VIDEO : मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज

मुंबई : बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी मनसेने (MNS Morcha teaser) वातावरण निर्मिती सुरु केली आहे. महामोर्चाचा पहिला टिझर (MNS Morcha teaser) आज मनसेने जारी केला आहे. महामोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करणारे होर्डिंग्स मुंबईत झळकू लागले आहेत.

रविवारी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मनसे महामोर्चातून शक्तिप्रदर्शन करणार आहे. आझाद मैदान येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी ऑगस्ट 2012 मध्ये राज ठाकरे यांनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढला होता. 9 फेब्रुवारीच्या महामोर्चाच्या निमित्ताने त्या मोर्चाच्या आठवणी ताजा झाल्या आहेत.

जवळपास 8 वर्षांनी मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षातर्फे आयोजित महामोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

मनसेचा इशारा

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाची ‘मोर्चेबांधणी’ही चांगलीच सुरु केली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर (MNS Versova Poster) लावण्यात आलं आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलं आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावं आहेत.

मनसेचा मोर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे.  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा निघणार आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने नवा मार्ग निवडला आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या 

बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा, पोस्टरमधून ‘मनसे’ इशारा

 स्पेशल रिपोर्ट | मोर्चाआधीच मनसेची जोरदार ‘मोर्चेबांधणी’