आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेकडून विद्याविहार ते मुलुंड दरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी रविवारी (5 जानेवारी) मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे

आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेकडून विद्याविहार ते मुलुंड दरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी रविवारी (5 जानेवारी) मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे (Central Railway Megablock). शिवाय, विक्रोळी स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री (4 जानेवारी) 12 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक (Harbour Railway) ठेवण्यात आला आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर या रविवारी कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशाचा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी घेतल्या जात असलेल्या या मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांची थोडी गैरसोय होणार आहे. इतकंच नाही तर 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम रेल्वेवर वांद्रे यार्डामध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये 6 तारखेच्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे लोकल गाडय़ांवर परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

मेगाब्लॉक कुठे आणि कधी?

मध्य रेल्वे :

मुलूंड ते माटुंगा दरम्यान 11.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक अप जलद मार्गावर असणार आहे.

परिणाम : कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर धावतील. परळनंतर लोकल पुन्हा जलद मार्गावर पूर्ववत होणार आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकवेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत.

हार्बर रेल्वे :

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.