Mumbai Corona Vaccine : मुंबईकरांच्या चिंतेत भर, 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा!

Mumbai Corona Vaccine : मुंबईकरांच्या चिंतेत भर, 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा!
कोरोना लसीकरण

मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.

सागर जोशी

|

Apr 06, 2021 | 10:37 PM

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार पार गेलाय. अशास्थितीत मुंबईकरांची चिंता अजून वाढवणारी बातमी आहे. मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीय. पुढील साठा येईपर्यंत मुंबईत कोरोना लसीचे फक्त 1 लाख 85 हजार डोस शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. (Corona vaccine shortage in mumbai, information by mayor kishori pednekar)

कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची अडचण

राज्य सरकारकडून लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे वारंवार विनंती केली जात आहे. पण केंद्राकडून लस पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुंबईत कोरोना लसीचे फक्त 1 लाख 85 हजार डोस शिल्लक आहेत. त्यात कोविशिल्डचे 1 लाख 76 हजार 540, तर कोवॅक्सिनचे 8 हजार 840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांचीही अडचण होण्याची शक्यता आहे.

कोरोना लसीचा पुढील साठा 15 एप्रिलला

मुंबईत प्रत्यक्षात लसीच्या 8 ते 10 लाख डोसची गरज आहे. त्यापैकी 5 ते 6 लाख डोसचा रिझर्व्ह साठा हवा. 5 लाखापेक्षा कमी साठा झाल्यास त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असतो. आता कोरोना लसीचा पुढचा साठा 15 एप्रिल रोजी येणार आहे. तो साठाही अपुराच पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या 108 लसीकरण केंद्र आहेत. तर दिवसाला सरासरी 50 हजार नागरिकांना लस दिली जाते.

महापौरांचा केंद्रावर निशाणा

“येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईतील कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा भासणार आहे. पुढच्या लसीचा साठा 15 एप्रिलनंतर येणार आहे. मग तोवर आम्ही काय करायचं? महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्राचं सुरु आहे. आम्ही लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे तर मग लसींचा साठा तरी हवा. राज्य सरकारनं केंद्राला पत्रही पाठवलं आहे. तरीही आम्हाला लस मिळत नाही”, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केलीय.

मुंबईत दिवसभरात 10 हजारापेक्षा अधिक रुग्ण

गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे.

संबंधित बातम्या :

25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर

BMC Corona Guidelines: रुग्ण आढळल्यास घरे सील, नियम मोडल्यास सोसायटीला तगडा दंड, मुंबईत कडक नियम

Corona vaccine shortage in mumbai, information by mayor kishori pednekar

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें