भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचंही युवासेनेनं सांगितलंय.
मुंबई: भाजपचे नेते आणि आमदार राम कदमांनी (Ram Kadam) पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्यानं राम कदमांचा आता निषेध नोंदवण्यात आलाय. वरळीत युवासेनेकडून भाजप नेते आणि आमदार राम कदमांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. आमदार राम कदम यांच्याविरोधात तुफान नारेबाजीसुद्धा करण्यात आलीय. भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचंही युवासेनेनं सांगितलंय. (Protest march against Ram Kadam from Yuvasena in Worli)
महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे आज युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात येत आहे. भाजप पक्षाचे गुंड तसेच त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार राम कदम यांनी आपली संस्कृती दाखवल्याचा शिवसैनिकांनी घणाघात केलाय. महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला जर भाजपसारखा गुंड प्रवृत्तीचा पक्ष खतपाणी घालत असेल तर ‘युवासेना’ अखेरपर्यंत कडाडून विरोध करणार असल्याचंही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलंय.
गुंडगिरी मानसिकतेच्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे, युवासेनाप्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेनेच्या कोर टीमच्या पुढाकाराने आज दुपारी 2.30 वाजल्यापासून मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चाद्वारे सदर गुंडगिरी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ह्या कृत्याने भाजप पक्षाचे गुंड तसेच त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार राम कदम यांनी आपली संस्कृती दाखवून दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला ट्रिपल सीट हे कार्यकर्ते जात असताना धडकले होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना नितीन खैरमोडे या कॉन्स्टेबलला त्या आरोपींनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले.
या वेळी नितीन यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तेव्हाच या तिघांनी रिक्षातून पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या पोलिसांनी सचिनला पकडले आणि दिपू आणि आयुष तिथून फरार झाले. सध्या पवई पोलीस या दोघांचा शोध घेत आहे. हे तिघे ही भाजपचे कार्यकर्ते असून, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, असे गुन्हे दाखल केले असून, पुढील कारवाई करीत आहेत.
पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन
राम कदमांमुळे भाजपची पुन्हा पुन्हा डोकेदुखी?
Protest march against Ram Kadam from Yuvasena in Worli