मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं, नागरिकांची तारांबळ

Rain Arrives in Mumbai : राज्यातील अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. राजधानी मुंबई आणि उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं, नागरिकांची तारांबळ
Rain Starts in Mumbai
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 09, 2026 | 7:19 PM

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. राजधानी मुंबई आणि उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्ते ओले चिंब झाले असून वाहने धीम्या गतीने धावत आहेत. या पावसामुळे उकाड्या पासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदरडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे शेतकरी लक्ष्मण पगार यांच्या 2 एकरातील डाळिंब बागेला फटका बसला. ऊन आणि पावसापासून बचावासाठी त्यांनी बागेला नेट अंथरली होती. मात्र वादळी वाऱ्याने तिचे नुकसान झाले, तसेच फळांनी लगडलेली झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

माणगावमध्ये पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या तीव्रतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. उन्हाच्या कडक झळांपासून त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. या पावसामुळे शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेती कामांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

नांदेडच्या किनवटमध्ये तुफान पाऊस

नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ परिसरात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेत काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसामुळे गोंड जेवली नाक्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आता पुलाची उंची वाढवून नव्याने पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नांदेड – शिबदरा येथे वीज पडून 4 वानरांचा मृत्यू,

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिबदरा येथे वीज कोसळून चार वानरांचा मृत्यू झाला. शिबदरा येथे विजेच्या कडकडासह वादळी वारा आणि चांगलाच पाऊस झाला. या पावसावेळी गावामध्ये एका ठिकाणी वानराचा कळप होता. या कळपावर वीज पडल्याने चार वानराचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

Follow Us