डॉ. आंबेडकरांपासून ते अगदी राजारामबापूंपर्यंत अनेकांच्या शिक्षणात बडोदा संस्थानचा वाटा : शरद पवार

शरद पवार यांनी यावेळी बडोदा संस्थान आणि सयाजीराव गायकवाड यांच्या योगदानाविषयी देखील भाष्य केलं.

डॉ. आंबेडकरांपासून ते अगदी राजारामबापूंपर्यंत अनेकांच्या शिक्षणात बडोदा संस्थानचा वाटा : शरद पवार
शरद पवार

मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज (28 जानेवारी) भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, सहकार क्षेत्र, वस्त्रोद्योग आणि शेती अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. शरद पवार यांनी यावेळी बडोदा संस्थान आणि सयाजीराव गायकवाड यांच्या योगदानाविषयी देखील भाष्य केलं (Sharad Pawar comment on contribution of Sayajirao Gaikwad in Education).

शरद पवार यांच्या कार्यालयाकडून आज बैठक नियोजित करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी 10 वाजता बैठक पार पडली. शरद पवार यांनी या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा करताना काही सूचनाही केल्याचं यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितलं. या बैठकीला राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत सिद्धेश तेंडुलकर, शरद साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे आणि विशेष कार्य अधिकारी सचिन बडवे उपस्थित होते.

या भेटी दरम्यान सिद्धेश तेंडुलकर यांनी शरद पवार यांना उमा बालसुब्रमण्यम लिखित बडोदा संस्थानचे तिसरे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनचरित्र ग्रंथाची प्रत भेट दिली. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘त्याकाळी आपल्या भागात शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. त्यावेळी बडोदा संस्थानचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली होती. त्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे उभारली. परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांचे कार्य फार मोठे आहे.’

“सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे त्याकाळात अनेकांना शिक्षण घेणे शक्य झाले. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सध्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांचे शिक्षणही याच बडोदा संस्थानच्या माध्यमातून झाले होते. सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या महाराजांमुळे अनेक विद्यार्थी घडले, मोठे झाले. त्यांनी महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीही योगदान दिले आहे. अशा थोर नेत्याचे कौतूक व अभ्यास करावा तितका कमी आहे. त्यांच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही,’ असंही शरद पवारांनी सांगितलं. यावेळी शरद पवारांचा मोठेपणा पाहून त्यांना जाणता राजा असे का संबोधले जाते याची प्रचिती आल्याचं मत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

‘अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजेंचा सवाल

‘देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी’, पवारांचा विखेंना टोला

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment on contribution of Sayajirao Gaikwad in Education

Published On - 6:58 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI