शिवसेनेच्या झेंड्याचा रंग भगवाच आणि आयुष्यभर भगवाच राहणार : अनिल परब

'आम्ही शिवसेनेचा रंग बदलला नाही आणि झेंडाही आमचा भगवाचा आहे', असा टोला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

  • योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी, मुंबई
  • Published On - 23:42 PM, 23 Jan 2020
शिवसेनेच्या झेंड्याचा रंग भगवाच आणि आयुष्यभर भगवाच राहणार : अनिल परब

मुंबई : ‘आम्ही शिवसेनेचा रंग बदलला नाही आणि झेंडाही आमचा भगवाचा आहे’, असा टोला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला (Anil Parab On Raj Thackeray). उलट त्यांनीच झेंड्याचा रंग बदलला, असं म्हणत अनिल परब यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन झालं. यामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती (Anil Parab On Raj Thackeray).

“अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही. जे योग्य त्याचं अभिनंदन, जे चुकीचं आहे त्यावर बोलणारच”, असं राज ठाकरे म्हणाले होते. यामध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्याने त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावर आता शिवसेना नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “झेंड्याचा रंग कुणी बदलला हे सर्वांनी आज पाहिलं. आम्ही शिवसेनेचा रंग बदललेला नाही, आमच्या झेंड्याचा रंग भगवाच आहे आणि आयुष्यभर तो भगवाच राहणार आहे”.

मनसे CAA समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याचंही राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात म्हटलं. यावर “तो त्यांचा पक्ष आहे, त्यांना काय करायचं ते करु शकतात”, असं उत्तर अनिल परब यांनी दिलं.

आमच्यासाठी 23 जानेवारी हा सण : अनिल परब

“सोहळा उत्कृष्ट झाला, शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आमच्यासाठी 23 जानेवारी हा सण असतो, सण सणासारखाच साजरा व्हायला हवा आणि आम्ही तो साजरा केला”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

हेही वाचा :  मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा

आज (23 जानेवारी) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या सोहळ्याचं आयोजन अनिल परब यांनी केलं होतं.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 11 ज्येष्ठ शिवसैनिकांनी सत्कार केला. या सत्कार सभारंभापूर्वी अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. अवधुत गुप्ते, अभिजित केळकर, मयुरेश पेम, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांसह अनेक कलाकारांचे मनोरंजनपर कार्यक्रम झाले.