नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का? : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरुन चांगलंच घेरलं आहे.

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:49 PM, 14 Jan 2021

मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरुन चांगलंच घेरलं आहे. नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? थेट असाच सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. तसेच एनसीबीच्या कारवाईवर राजकारण करु नये, असंही म्हटलं (Sudhir Mungantiwar criticize Nawab Malik over NCB action on son-in-law).

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “हे आधीपासूनच फसवे आहेत. नवाब मलिक हे मंत्री आहेत, तर मग त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर त्यात राजकारण कशाला आणता? आरोप गंभीर आहेत तर त्या दृष्टीने तपास करून कारवाई व्हायलाच पाहिजे. याबद्दल आमच्या दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलीय.”

“प्रत्येक वेळी विरोधाला विरोध करायलाच हवा का? पोलिसांना कारवाई करू द्या. त्यानंतर आम्ही बघू. भाजप विरोधक म्हणून कुठेही कमी पडत नाहीये. पक्षाच्या अंतर्गत वाद असतील, तर ते पडळकरांना जास्त माहिती असतील, कारण ते त्या भागात जास्त आहेत. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे यावर फार काही बोलणार नाही,” असंही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

हेही वाचा :

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिक म्हणाले….

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड, समीर खान यांच्या घरी सर्च ऑपरेशन

नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा

व्हिडीओ पाहा :

Sudhir Mungantiwar criticize Nawab Malik over NCB action on son-in-law